महाविद्यालयाने सोडले विद्यार्थ्यांना अर्ध्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या सत्रापासून बंद होत आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झालेले आहेत. याविरोधात अकरा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात महाविद्यालयाविरोधात तक्रार दिली आहे.

नागपूर : अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी या सत्रापासून बंद होत आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झालेले आहेत. याविरोधात अकरा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. 27) विद्यापीठात महाविद्यालयाविरोधात तक्रार दिली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बऱ्याच जागा रिक्त असल्याने महाविद्यालये बऱ्याच अडचणीत आहेत. याशिवाय अनेक वर्षांची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महाविद्यालयांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. यातूनच अनेक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर असून काहींनी त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. यातूनच गोंडखैरी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या प्रशासनाने तीन वर्षांपूर्वीच महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी महाविद्यालयाला एनआयसीटीईने "प्रोग्रेसिव्ह क्‍लोजर'ला मान्यता दिली. त्यामुळे महाविद्यालयाने गेल्या तीन वर्षांपासून एकाही विद्यार्थ्याचा प्रथम वर्षात प्रवेश दिलेला नाही. मात्र, शेवटच्या सत्रात विद्यापीठ व "डीटीई'ने महाविद्यालय बंद करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणारे 11 विद्यार्थी पुढे आले आहेत. हे विद्यार्थी एटीकेटीतून उत्तीर्ण झालेले असून त्यांना अंतिम वर्षात प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, महाविद्यालयाने डीटीईच्या निर्णयाचा आधार घेत, प्रवेशास स्पष्ट नकार दिल्याने त्या विरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार दिली आहे. तक्रारीत महाविद्यालयाविरोधात आरोप करून शुल्क वसूल करूनही प्रवेशास नकार दिल्याचे नमूद केले आहे. शेवटल्या वर्षाचे परीक्षा अर्ज भरण्याची वेळ आली असता विद्यापीठाने अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकाराने विद्यार्थ्यांचे करिअर धोक्‍यात आले आहे.

विद्यापीठाने तोडगा काढावा
महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून रोडावलेल्या विद्यार्थी संख्येमुळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे महाविद्यालयाने तीन वर्षांपासून एकही प्रवेश स्वीकारला नाही. महाविद्यालयातील नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, आता काही माजी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने त्यांना शेवटल्या वर्षात प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे 11 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा महाविद्यालय सुरू करणे शक्‍य नसल्याची माहिती महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या एका सदस्यांनी दिली. विद्यार्थ्यांकडे महाविद्यालय बदलण्याचा पर्याय शिल्लक आहे. मात्र, विद्यार्थी एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्याने त्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभाग (डीटीई)ची एक अटीनुसार दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आता व्यवस्थापनाने विद्यापीठाला सल्ला मागितला असून यावर तोडगा काढण्याची विनंती केली असल्याचे सदस्याने सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half of the students dropped out of college