हनुमान जन्मोत्सव विशेष : ३० हजार किलोंची भाजी, १० हजार लिटर मठ्ठा  

हनुमान जन्मोत्सव विशेष :  ३० हजार किलोंची भाजी, १० हजार लिटर मठ्ठा  

नागपूर - खास राजस्थानातील जैसलमेर येथून मागवलेल्या १८०० रुपये किलोच्या  केर, सांगरीची तब्बल तीस हजार किलोंची भाजी, दहा हजार किलोची मिक्‍स वेज, २५ हजार किलो डाळभाजी, १० हजार लिटर मठ्ठा आणि मोठमोठ्या सुमारे पाच लाख चपात्या तयार करण्याचे काम सीताबर्डी येथील श्रीटेकडी रोड हनुमान मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून सुरू आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. १९)  रात्री उशिरापर्यंत भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येईल. 

श्रीहनुमान जन्म महोत्सवानिमित्त सीताबर्डी परिसरातील श्री टेकडी रोड हनुमान मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शहरातील विविध भागांतील सुमारे तीन लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. या महाप्रसादाची तयारी तीन दिवस केली जाते. 

वसंत पंचमीपासूनच हनुमान जन्मोत्सवाची तयारी सुरू होते. गुप्त दान आणि खाद्यपदार्थांचे दान या मदतीने भव्यदिव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसाद तयार करण्यासाठी ५०० कामगार मदतीसाठी कार्यरत असून, यात प्रत्येक कामाची विभागणी करून, समूहनिहाय जबाबदाऱ्यांचे  वाटप केल्याने कर्मचारी नियोजनबद्ध कार्यरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. महाप्रसादासाठी खास राजस्थान, जैसलमेर येथून पाचशे किलो केर, 

सांगरी मागविण्यात आली आहे. (जैसलमेर येथे लेसवा (गुंदा) म्हणून ही भाजी खातात) ही भाजी ४५ अंश तापमानातही आठ दिवस टिकते. त्यामुळे महाप्रसादासाठी याच भाजीचा वापर केला जात असल्याचे आचाऱ्यांनी सांगितले. यामध्ये एक हजार किलो कैरी टाकण्यात येणार असून, सुमारे २५ ते ३० हजार किलो भाजी कालपासून तयार झाली आहे. 

दान देणाऱ्याला पॅकिंग प्रसाद 
महाप्रसादासाठी नागपूरकर आपापल्या परीने दान करीत आहेत. कुणी तेल, कुणी गहू, कुणी डाळ असे सर्वच पदार्थ गाड्या भरून मंडपात दाखल होत आहेत. दान देणाऱ्या प्रत्येकाला आयोजन समितीकडून कुपन दिले जाते. ज्या लोकांच्या घरच्या व्यक्तींना महाप्रसादासाठी मंडपात येणे  शक्त होत नाहीत अशांना पॅकिंग प्रसाद देण्याची सुविधा समितीने केली आहे. यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत असून, प्रसाद पॅकिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कुपन मिळालेल्या सर्व भाविकांनी आपल्या प्रसादाचे पार्सल घेऊन जावे, असे आवाहनही समितीने केले.

पोळ्या करण्यासाठी  वरूडच्या महिला 
महाप्रसादासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात सुमारे पाचशे स्वयंपाकी विविध पदार्थ तयार करत आहेत. भाजी धुणे, चिरणे, पीठ मळणे, मोहनथाळ तयार करणे, पकोड्यांसाठी डाळ बारीक करणे, पकोडे तळणे आदी कामांसाठी वीस वीसच्या समूहाने स्वयंपाकी कार्यरत आहेत. पोळ्या करण्यासाठी खास वरूड येथून ७० महिला बोलवल्या आहेत. या महिला विशिष्ट पद्धतीने मोठ्या चपात्या करण्याचे काम करतात. सुमारे ५ लाख चपात्या महाप्रसादासाठी तयार करण्यात येतील.  

महाप्रसादाचा महामेनू 
केर, सांगरीची रस्सा भाजी
 (३० हजार किलो)
  मिक्‍स वेज (अन्नकुट) 
   (१५ हजार किलो) 
  डाळभाजी ( २ हजार किलो) 
  मठ्ठा ( १० हजार लिटर) 
  मोहनथाळ (१५०० किलो) 
  पकोडे (२ हजार किलो) 
  भात (७ हजार किलो) 
  चपात्या (५ लाख ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com