अमरावती : तब्बल शंभर वर्षांपासून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावणारे येथील जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने नव्या वर्षात नवा संकल्प केला आहे. ऑलिम्पिकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दरवर्षी २५ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना तयार करण्याचा संकल्प केला आहे.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, चौथ्या वर्गात असलेल्या २५ विद्यार्थ्यांची दरवर्षी निवड करण्यात येईल. त्यांना सुरुवातीला बारावीपर्यंतचे शिक्षण येथे देण्यात येईल. त्या मुलांच्या राहण्याची तसेच जेवणाची सर्व व्यवस्था आम्ही करू. सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास, असे सहा तास तो त्याच्या आवडीचा खेळ खेळेल. त्यांच्यासाठी उत्तमातील उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील.
बारावी झाल्यावर ही मुले येथेच बीपीएड व एमपीएड करतील. म्हणजेच तब्बल १५ वर्षे ते त्यांच्या आवडत्या खेळात दररोजचे सहा तास सराव करतील व त्यातून कोणत्याही स्पर्धेसाठी सज्ज राहतील. येथील काही खेळाडू निश्चितपणे ऑलिंम्पिकसाठी झेप घेतील. या मुलांच्या पुढील उदरनिर्वाहासाठी त्यांना नोकरी निश्चितपणे मिळेल. दरवर्षी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने आगामी काही वर्षात उत्तमातील उत्तम खेळाडू तयार करण्याची प्रक्रिया अतिशय झपाट्याने होणार आहे, असे प्रभाकरराव वैद्य यांनी सांगितले.
सर्व मुलांच्या राहण्याचा तसेच जेवणाचा खर्च आम्हीच करणार असून, त्यांना अभ्यास तसेच त्यांच्या आवडीच्या खेळावर लक्ष द्यावयाचे आहे. विशेष म्हणजे, देशात स्पेशल क्रीडा विद्यालय कुठेच नाही. मात्र, आपल्याकडे रामकृष्ण क्रीडा विद्यालय आहे. त्यामुळे त्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे काम येथे करण्यात येईल. या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरूनसुद्धा प्रशिक्षकांना बोलविण्यात येईल, अशी माहिती प्रभाकरराव वैद्य यांनी दिली.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने आपला व्याप प्रचंड वाढविला आहे. विविध मैदनांसह अत्याधुनिक उपकरणेसुद्धा येथे आणण्यात आल्याने पारंपरिक खेळांचे जतन करण्यासोबतच नव्या क्रीडा प्रकारांना येथे प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्पोर्टस इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनसुद्धा या संस्थेने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रगतीची पावले पुढे टाकली आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.