लाॅकडाउनमध्ये वाढदिवसाची पार्टी, मग काय शेतात जमले 15 मित्र; मात्र हेच कारण बेतले तरुणाच्या जीवावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

खामगाव येथील रहीवासी असलेले 14 ते 15 मित्र वाढदिवसानिमित्ताने पार्टी करण्यासाठी चिखली बु. शिवार पोलिस स्टेशन जलंब येथे विठ्ठल लाहुडकर यांच्या शेतात जमले होते.

जलंब (जि.बुलडाणा) : लॉकडाउनचे उल्लंघन करून वाढदिवसाची पार्टी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून जवळपास 14 ते 15 मित्र वाढदिवस साजरा करण्याकरिता एकत्र जमले व त्यातील एक तरुण शेतातील विहिरीत आंघोळीसाठी गेला असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली बु. परिसरात घडली. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

जलंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील रहीवासी असलेले 14 ते 15 मित्र वाढदिवसानिमित्ताने पार्टी करण्यासाठी चिखली बु. शिवार पोलिस स्टेशन जलंब येथे विठ्ठल लाहुडकर यांच्या शेतात जमले होते. बाजूला विहीर असल्याने त्यांच्या पैकी दिपक शर्मा (वय 37, रा. निळकंठ नगर, खामगाव) हा विहिरीत आंघोळीसाठी गेला. 

हेही वाचा - हृदयद्रावक सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

मात्र, बराच वेळ होऊन परत न आल्याने त्याचा इतरांनी शोध घेतला असता तो दिसला नाही. तो विहिरीतच आहे की, बाहेर आला? हे निश्चित कुणास माहिती नसल्याने दरम्यान या घटनेची माहिती कळताच जलंब पोलिस स्टेशनचे ठाणेदार पी. आर. इंगळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळी दिपक शर्माने अंगातील काढून ठेवलेले कपडे बाजुलाच असल्याने तो विहीरीतच असणार असा कयास बांधून विहिरीमध्ये शोधकार्य सुरू केले. विहिरीला सुमारे 30 फुट खोल पाणी असल्याने सर्वप्रथम विहिरीचे पाणी उपसणे सुरू केले आणि बाजुच्या गावात राहणारे गोताखोर (पाण्यात पोहणारे) प्रकाश खवले तसेच संतोष धोटे रा. माटरगाव यांना बोलावून त्यांच्या मदतीने विहीरीत दिपक शर्मा याला शोधण्याचे कार्य सुरू केले असता तळाशी दिपकचा मृतदेह त्यांना सापडला. 

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

मृतक दिपक शर्मा याचे सोबतच पार्टी करिता आलेले त्याचे नातेवाईक प्रशांत शर्मा यांच्या तक्रारीवरुन जलंब पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन वेळोवेळी करीत असलेल्या नियमांचे उल्लंघन करून एकत्र जमणाऱ्या 14 जणांविरुद्ध जलंब पोलिस स्टेशनला गुन्ह्यांची नोंद सुद्धा करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Having a birthday party in lockdown cost the young man his life in buldana district