esakal | आईला मारहाण केल्याने मुलाने पाडला बापाचा मुडदा...बेलोऱ्यात घडली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दारूच्या व्यसनामुळे अनेक घटना घडत आहेत. बेलोऱ्यात क्षुल्लक कारणावरून एका बापाने आपल्या पत्नीला जबर मारहाण केली. ही मारहाण मुलाने पाहिल्याने त्याचा माथा भडकला अन्‌ त्याने बापावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना आर्वी तालुक्‍यातील बेलोरा येथे शुक्रवारी (ता. 10) घडली.

आईला मारहाण केल्याने मुलाने पाडला बापाचा मुडदा...बेलोऱ्यात घडली घटना

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : घरगुती वादातून सख्या मुलाने बापाचा खून केला. ही घटना तळेगाव (शा. पं.) पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बेलोरा येथे शुक्रवारी (ता. 10) रात्री घडली. पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे.

रवींद्र बाबरे (वय 52) असे मृताचे नाव आहे. तर पीयूष बाबरे (वय 20) असे आरोपी मुलाचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रवींद्र बाबरे याचा शिवणकामाचा व्यवसाय होता. पत्नी व दोन मुलासह ते एकत्रच राहत होते. रवींद्र बाबरे याला दारूचे व्यसन जडले होते. त्याच्याकडे तीन एकर शेत आहे. शेतात पेरणी केली मात्र बी उगवले नाही.

शुक्रवारी (ता. 10) रात्री तो नशेत आला व शेतातील बियाणे का निघाले नाही, यावरून वाद करून पत्नीला मारहाण सुरू केली. यावेळी उपस्थित असलेला मुलगा पीयूष याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्रने त्यालासुद्धा मारहाण केली. यात झटापटी होऊन प्रकरण हातघाईवर आले.

मुलाने केला बापावर धारदार शस्त्राने वार

मुलाने धारदार शस्त्राने रवींद्रवर वार केला व यातच त्याचा मृत्यू झाला. प्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार रवी राठोड, उपनिरीक्षक धीरज राजुरकर हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी मुलगा पीयूष बाबरे याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसानी पीयूष बाबरे विरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली. त्याला अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी व ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शन सुरू आहे.

हेही वाचा : काय सांगता! जिल्हा प्रशासनातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात, वर्धेकरांत भीतीचे वातावरण

रवींद्रनेही केला होता आईचा खून

या घटनेतील मृत रवींद्र बाबरे याने 2007 मध्ये त्याच्या आईचा खून केला होता. या प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगून तो 2018 मध्ये घरी परत आला होता. मात्र, त्याच्या व्यवहारात काहीच फरक पडला नव्हता. यातून हा वाद झाला. त्याचेच पर्यंवसान खुनात झाले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)