त्याने एकट्यानेच केली 22 घरफोडी; 15 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

बंद घरांना टार्गेट करीत लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ करणाऱ्या सराईत चोरट्याला गजाआड करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे एकट्यानेच या चोऱ्या केल्या आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी 22 घरफोड्यांची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून एकूण 14 लाख 45 हजार 750 रुपये किमतीचे सोने व चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिरोज खान ऊर्फ रंडो साहेब खान (वय 29, रा. तुकारामबापू वॉर्ड, पुसद) असे सराईत चोरट्याचे नाव आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चोरीचा छडा लावण्याची जबाबदारी एका पथकाकडे दिली. चोरीच्या घटनांचा मास्टरमाइंड एकटा फिरोज खान असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिस 15 दिवसांपासून त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. शनिवारी (ता. चार) तो चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी वाशीममार्गे पुसद येथे जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने पुसद येथील भोजला टी-पॉइंटजवळ सापळा रचला. 

चोरटा फिरोज खान दुचाकीने येताना दिसताच शिताफीने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ 12 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख एक हजार 750 रुपये मिळून आले. विश्‍वासात घेऊन चोरट्याला विचारपूस केली असता, त्याने 22 गुन्ह्यांची कबुली दिली. 

हे सोने बुलडाणा व हैदराबाद येथील भाड्याने घेतलेल्या घरी लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरातून सोने जप्त केले. हैदराबाद येथे सराफाला विक्री केलेले दागिनेही जप्त करण्यात आले. यवतमाळ, पुसद, उमरखेड, दारव्हा, आर्णी, महागाव, कळंब आदी ठिकाणांच्या घरफोड्यांचा उलगडा करण्यात आला. एकूण 309 ग्रॅम सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी, दुचाकी असा एकूण 14 लाख 45 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

दिवसा पाहणी, रात्री घरफोडी 

फिरोज खान हा अट्टल चोरटा असून, त्याच्या शिरावर आदिलाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नांदेड, हिंगोली, परभणी येथेही गुन्हे दाखल आहेत. दिवसा शहरात फिरून बंद असलेले घर शोधायचा. दिवसा किंवा रात्री संधी मिळताच कुलूपकोंडा तोडून घरातील मुद्देमाल लंपास करायचा, अशी त्याची "मोड्‌स ऑपरेंडी' होती. 

जाणून घ्या : भारतात दोन कोटी जोडपी संततीशिवाय

वयाच्या पंधराव्या वर्षी पहिली चोरी 

सराईत चोरटा आता 29 वर्षांचा आहे. त्याने 2005पासून चोरीला सुरुवात केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यावरून वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने पहिली चोरी केल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी त्याला पोलिसांनी अटकही केली. मात्र, पोलिसी खाक्‍याचा त्याच्यावर काही फरक पडला नाही. आपले चोरीचे कारनामे सुरूच ठेवले. 

आदिलाबादमध्ये 28 गुन्ह्याची नोंद 

मूळचा पुसद येथील रहिवासी असलेला फिरोज खान याने हैदराबाद व बुलाडाणा जिल्ह्यात घर भाड्याने घेतले होते. चोरी केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो तेथे रहायचा. या कालावधीत आदिलाबाद जिल्ह्यात त्याच्या 28 चोरीचे गुन्हे नोंद आहेत. शिवाय हिंगोली, नांदेड, परभणी येथेही घरफोडी केली आहे. 

असे का घडले? : तुम्ही प्रेमीयुगुल आहात अन्‌ प्रायव्हसी हवी आहे?, मोबईल आहे ना...

पोलिस ठाणेनिहाय चोरी 

सराईत चोरट्याने सर्वाधिक चोऱ्या यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात केली. अवधूतवाडीत सात, यवतमाळ शहर पोलिस ठाणे, पाच, आर्णी, महागाव प्रत्येकी दोन, वसंतनगर, दिग्रस, दारव्हा, कळंब, उमरखेड येथे प्रत्येकी एक याप्रमाणे 22 चोरींचा उलगडा करण्यात आला. 

लवकरच सराफांवरदेखील कारवाई 
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पोलिसांनी केलेली मोठी कारवाई आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेल. घरफोड्यांची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी आपले कसब वापरून सराफाकडूनही मुद्देमाल जप्त केला. लवकरच सराफांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. 
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, यवतमाळ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he made 22 homes robbery by alone