त्यांनी केले भगिरथ प्रयत्न अन्  खेचून आणले या नदीचे पाणी 

Sinchan
Sinchan

कोंढा-कोसरा (जि. भंडारा) : गोसे बुजरूक उपसा सिंचन योजनेचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. सदर योजनेवर एकूण 21 गावांच्या शेतीचे सिंचन अवलंबून आहे. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे योजना पूर्ण होऊनही धरणाजवळील शेतीला सिंचनाचा फायदा मिळत नव्हता. आता युवकांच्या पुढाकारातून तांत्रिक अडचण दूर केल्यामुळे या योजनेचे पाणी शेतात पोहोचले. त्यामुळे येथील शेतकरी सुखावले आहेत. 

वैनगंगेवरील गोसेखुर्द धरणामुळे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचन मिळत आहे. या धरणावर असे उपसा सिंचन प्रकल्पांतून सिंचनाचा फायदा मिळतो. परंतु, धरणाजवळील गावांतील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामध्ये गोसे (बुज.), गोसेखुर्द, मेंढा, पाथरी, कुर्झा, लोणारा, वासेळा, कोंढा-कोसरा, निलगुडी, आकोट, चिचाळ, बाह्मणी, सिंधपुरी, इटगाव, पालोरा आदी गावांचा समावेश आहे. या गावांच्या सिंचनासाठी गोसे (बुज.) उपसा सिंचन योजना राबवण्यात आली. या संपूर्ण परिसरात तीन ते चार हजार हेक्‍टर शेतजमीन आहे. 

डाव्या कालव्याच्या गोसे बुज. उपसा सिंचन योजनेच्या कालव्याजवळ शेताला पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जमीन विक्रीत शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून योजनेच्या कालव्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, मुख्य कालव्याला पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे आज दुष्काळी परिस्थितीतही पाथरी, वासेळा, गोसे बुज. आणि गोसे खुर्द ही गावे शेताजवळ पाणी येऊनही कोरडीच राहिली आहेत. त्यामुळे परिसरात धरणाचे पाणी येऊनही दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती झाली आहे. 

तांत्रिक अडचणीची पाहणी 

या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आशिष माटे यांनी सदर कालव्याची पाहणी करून डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे यांना प्रत्यक्ष कालव्याच्या ठिकाणी आणून त्यांच्याशी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीवर चर्चा केली. ज्या शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे कालव्याचे काम थांबले आहे, ते शेतकरी विनायक येळमे, गंगाधर नागपुरे यांच्यासोबत बोलून त्यांच्या शेतातून दीड मीटर व्यासाची पाइपलाइन टाकून कालव्याला पाणी सोडण्याची विनंती केली. या अडचणीमुळे कालव्याचे खोदकाम थांबल्याने कार्यकारी अभियंता यांनी संवाद साधून शेतकऱ्यांची समस्या दूर केली. यामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेले कालव्याचे काम येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

यावर्षी दुष्काळी परिस्थितीत या दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनी खालून पाइपलाइन टाकण्याची परवानगी दिली. यामुळे सदर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. आशिष माटे यांनी नुकसान भरपाई म्हणून 14 हजार रुपये आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला गोसे बुज. उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. आता गोसेखुर्द परिसरातील शेतकऱ्यांना मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूच्या एक-एक किलोमीटर परिसरात शेतीला पाणी मिळाले आहे. 

युवकांची श्रमदानातून मदत 

या भागात शेतीमधून पाइपलाइन टाकण्यासाठी परिसरातील तरुणांनी प्रत्यक्षात सहा दिवस श्रमदान केले. यात शंकर लांडगे, विलास ठाकरे, सुरेश तलमले, रवींद्र ठाकरे, आकाश माटे, बाबूराव माटे, गोलू घोरमोडे, सुनील घोरमोडे, शांताराम लांडगे, चंद्रशेखर भगत, राहुल काळे, ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी मदत केली. तसेच क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासकीय पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा करून प्रकरण हाताळले. त्यामुळे 21 गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. अखेर गोसे(बुज.) परिसरातील शेतकरीवर्ग आनंदित झाला आहे. यावेळी विजय काटेखाये, बाळू फुलबांधे, आशिष माटे, प्रशांत भुते, सुधाकर साठवणे, जितू लिचडे, सरपंच रामचंद्र मेश्राम, वासेळाचे सरपंच किशोर ब्राह्मणकर, पाथरीच्या सरपंच रोडगे, शेखर रघुते, ओमा नागपुरे, होमा गजबे उपस्थित होते. 


बांधावरच शेतकऱ्यांचा सत्कार 

वादग्रस्त शेतजमीन मालकांची समजूत काढून कालव्याच्या कामातील अडथळा दूर केला. या दोन शेतकऱ्यांनी अपूर्ण कामासाठी परवानगी दिल्याने आमदार भोंडेकर यांनी दोन्ही शेतकऱ्यांचा बांधावरच सत्कार केला. त्यानंतर विधिवत जलपूजन करून कालव्याला पाणी सोडण्यात आले. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com