रेल्वेच्या फलाटावर "हेल्थ एटीएम' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नागपूर  : आधुनिक जीवनशैलीने आपल्याला सुखासोबतच वेगवेगळे आजारही दिले आहेत. अनेक आजारांच्या वेळोवेळी तपासण्या करून घेणे क्रमप्राप्त ठरते. पण, कधी अचानक यात्रेचा योग जुळून येतो, लांबवरच्या रेल्वे प्रवासादरम्यानही वैद्यकीय तपासण्या करून घेता येत नाही. यावर रेल्वे प्रशासनाने "हेल्थ एटीएम'चा उपाय शोधला आहे. पहिलेवहिले हेल्थ एटीएम नागपूर रेल्वेस्थानकावर उपलब्ध होणार असून अत्यल्प शुल्कात 21 प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करून घेता येणार आहेत. 

रेल्वे प्रशासनाने "इनोव्हेटिव्ह आयडीया' या संकल्पनेअंतर्गत उत्पन्नाचे नवनवे स्रोत शोधून काढण्यावर भर दिला आहे. रेल्वे प्रवाशांना सुविधा आणि त्यातून रेल्वेच्या उत्पन्नात भर अशाप्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना शोधण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर आतापर्यंत अशाप्रकारच्या 14 सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यापूर्वीच करार करण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात हेल्थ एटीएम सुरू करण्यात येत आहे. नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर ही सुविधा राहील. केवळ 2 बाय 3 फूट जागेत हे किऑक्‍स राहील. त्यात केवळ 5 मिनिटांमध्ये मधुमेह, रक्तदाब, वसा घनत्व, शरीरातील ऑक्‍सिजनची मात्र, हृदयाचे ठोके, किडनी व फुप्फुसासह 21 प्रकारच्या तपासण्या करून वेळीच संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना केवळ 60 रुपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. या उपक्रमातून रेल्वेला दरवर्षी 1 लाखाचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. 
या उपक्रमासाठी हैदराबादच्या टिम लीड कॉर्पोरेशनसोबत करार करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनात कराराची प्रक्रिया पार पाडण्यात आली. 
"फिट इंडिया'अंतर्गत दुसरा उपक्रम 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "फिट इंडिया' संकल्पना मांडली. "हेल्थ एटीएम' संकल्पनासुद्धा त्याला साजेशी अशीच आहे. यापूर्वीच नागपूर रेल्वेस्थानकावर फिटनेस कम वेलनेस सेंटर सुरू करण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे. फिटनेस सेंटरमध्ये जिममध्ये असणाऱ्या उपक्रमांसोबतच योगा करण्याची सुविधासुद्धा राहणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Health ATM' on railway tracks