गडचिरोलीतील अंकिसाचे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी; परिसरातील 12 गावांतील नागरिक अडचणीत

व्यंकटेश चकिनाला 
Thursday, 21 January 2021

अंकिसा गावाअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही वर्षांपासून म्हणजे डॉ. सातमवाड यांच्यानंतर येथे रुग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळालीच नाही. गावातील या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूची 12 गावे अवलंबून आहेत.

अंकिसा (जि. गडचिरोली) : सिरोंचा तालुक्‍यातील अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी झाले असल्याने येथील या केंद्राअंतर्गत येणाऱ्या 12 गावांतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अंकिसा गावाअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही वर्षांपासून म्हणजे डॉ. सातमवाड यांच्यानंतर येथे रुग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळालीच नाही. गावातील या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूची 12 गावे अवलंबून आहेत. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. मागील पावसाळ्यात गावात व परिसरात गावकऱ्यांना ताप येऊन अनेक आजार झाले. मात्र, या आरोग्य केंद्रात रोग्यांना उपचार मिळत नसल्याने बाहेरून आलेले डॉक्‍टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करत आहेत. 

हेही वाचा - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

एका रुग्णाकडून दोन दिवसांच्या उपचारासाठी तब्बल दहा हजार रुपये वसूल केल्याची माहिती मिळाली आहे. इतके महागडे उपचार येथील गरीब ग्रामस्थांना परवडणारे नाहीत. येथील रुग्णांना कोणत्याही किरकोळ आजारासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. ज्यांच्याकडे पैसा असतो ते इतर ठिकाणी किंवा तालुका मुख्यालयी जाऊन उपचार घेऊ शकतात. पण, गरीब रुग्णांनी कुठे जावे, असा प्रश्‍न येथील ग्रामस्थ विचारत आहेत. 

अंकिसा हे नक्षलप्रभावित अतिदुर्गम गाव आहे. या परिसरातील अनेक नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. अशावेळेस त्यांना खासगी दवाखान्यात किंवा तालुका मुख्यालयी जाऊन महागडे उपचार घेणे शक्‍य होत नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या दूर कराव्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा - अख्खं गाव हळहळलं! पत्नीवर अंत्यसंस्कार झाले अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही सोडला जीव

उमेदवारांकडून अपेक्षा...

बुधवारी ग्रामपंचायतीचे मतदान पार पडले. आता येथील ग्रामपंचायतीवर निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची समस्या दूर करावी. या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधा आणण्यासह आरोग्यसेवा वृद्धिंगत करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health care center in Ankisa is in bad condition in Gadchiroli