बेरोजगारांना गंडा; आरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तीन लाखांनी फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. प्रकरणी फिर्यादीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बनावट नियुक्तिपत्र असल्याचे निष्पन्न झाले.

अमरावती : आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत असल्याची माहिती आहे. अमरावती पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्यांपैकी काहींचे तार अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागात बनावट नियुक्तिपत्र देऊन एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती. तसेच यासंदर्भात काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहनसुद्धा केले होते. तसेच प्रकरण २५ जानेवारीला यवतमाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले.

जाणून घ्या - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'

आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तीन लाखांनी फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. प्रकरणी फिर्यादीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बनावट नियुक्तिपत्र असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यवतमाळच्या प्रकरणात तर ४ जणांची १९ लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा टोळी सक्रिय

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातसुद्धा असाच प्रकार घडला होता. सुरुवातीला बनावट नियुक्तिपत्र देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती अमरावतीपुरती मर्यादित असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा ही टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या टोळीतील काही सदस्यांचे अमरावती कनेक्‍शन आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department duplicate recruitment wire across Vidarbha