गोठ्याची घाण रस्त्यावर,अनेक वस्त्यांत दुर्गंधी

काछीपुरा ः वस्तीतील गोठ्यातील जनावरांचे शेणखत घरांच्या बाजूलाच टाकले जात असल्याने दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
काछीपुरा ः वस्तीतील गोठ्यातील जनावरांचे शेणखत घरांच्या बाजूलाच टाकले जात असल्याने दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत.

नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गायी, म्हशींचे गोठे असून, तेथील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दिवसभर दुर्गंधीने वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरून अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. विशेष म्हणजे पाचशेवर अनधिकृत गोठे असूनही कारवाईचे अधिकार असलेल्या दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी हात झटकले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या अनुषंगाने महापालिका कारवाईची केवळ औपचारिकता पार पाडत असल्याने नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
शहरातील रामेश्‍वरी, अभयनगर, वाठोडा, पांढराबोडी, इंदोरा, मानेवाडा, हजारी पहाड, झिंगाबाई टाकळी, नारा, नारी, मानकापूर, दिघोरी, जयताळा, कांजीहाऊस चौक परिसर यासह रामदासपेठ-काछीपुरासारख्या पॉश भागांमध्येही गायी, म्हशींचे गोठे आहेत. विशेष म्हणजे या गोठ्यातील घाण आता रस्त्यांवरही येत असून नागरिकांसह वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र अभयनगर चौकातील एका मुख्य रस्त्यावरील गोठ्यामुळे दिसून येत आहे. पांढराबोडी भागात तर संपूर्ण घाण रस्त्यावर येत आहे. काछीपुरा येथेही नाल्यालगतच्या रस्त्यावर कायम घाण दिसून येत आहे. दिवसभर गाय, म्हशी आदी जनावरे मोकाट सोडली असल्याचे चित्र रस्त्यावर दिसून येते. मोकाट गायी, म्हशी शिळे अन्न खात असल्याने त्या घाणीने गोठा असलेला परिसरच नव्हे तर रस्त्यांवरही दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. गोठे असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न यानिमित्त उभा ठाकला आहे. शहरातील गाय, म्हशीच्या मालकांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. गोठ्यांना परवानगी देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांनी तर आतापर्यंत एकाही गोठेधारकांवर कारवाई केल्याची आकडेवारी नाही. शहरात हजारांवर गोठे असून त्यातील 60 टक्के गोठे अनधिकृत आहे. मात्र, दुग्ध व्यवसाय अधिकारी कधीही त्याकडे बघत नसल्याचे महापालिकेतील सूत्राने नमूद केले. महापालिका केवळ स्वच्छतेबाबत आग्रही असून त्यावरून कारवाई करीत असल्याचेही सूत्राने नमूद केले. परंतु अनधिकृत गोठेधारकांवर कारवाईचे अधिकार त्यांच्याकडेच असल्याने महापालिकेला मर्यादा आल्याचेही समजते.
शहराबाहेर गोठ्यांची योजना धूळखात
शहरातील गोठे बाहेर नेण्याबाबत मनपाने वाठोड्यात नंदग्राम योजनेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र, आता वाठोडा येथे सिम्बॉयसिससारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे वाठोड्यात गुरांचे गोठे तयार करणे शक्‍य नसल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे ही योजना बारगळल्याचेच चित्र आहे. परिणामी शहराच्या मध्यभागासह इतरही भागात गुरांचे गोठे कायम राहणार असून नागरिकांना दुर्गंधी, घाणीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com