माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेसाठी प्रशासन सज्ज; जिल्ह्यातील प्रत्येक घरात होणार कोरोना सर्वेक्षण

मिलिंद उमरे 
Wednesday, 16 September 2020

जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने 15 सप्टेंबरपासून ते 25 ऑक्‍टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अ

गडचिरोली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यात होत आहेत. यासाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कोरोनासंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. प्रत्येक नागरिकाने व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने 15 सप्टेंबरपासून ते 25 ऑक्‍टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, आरोग्य शिक्षण साधणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

क्लिक करा - CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून आरोग्य तपासणी, त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे या बाबी मोहिमेत राबविल्या जाणार आहेत. 

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्‍यक त्रिसूत्रीवर मोहिम आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे या बाबतचे महत्त्व नागरिकांना या मोहिमेत पटवून दिले जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदी ठिकाणी राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे आदीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. 

जिल्ह्यात हजारो पथके नेमून प्रतिपथक 50 कुटुंब वाटप केले जाणार आहेत. या पथकांकडून प्रत्येक घरावर स्टीकर लावण्यात येईल. तसेच ऑक्‍सिमीटरने ऑक्‍सिजन, थर्मोमीटरने ताप व घरातील माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये तीव्र जोखमीचे व्यक्ती कोण कोण आहेत, आजार आहेत काय, तसेच प्रवासाबाबत माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी आपली अचूक माहिती आलेल्या पथकातील सदस्यांना द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी -'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर

बक्षीस योजनेचाही समावेश...

विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांच्यासाठी निबंध, पोस्टर्स, शॉर्ट फिल्म स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर 5 हजार, 3 हजार व 2 हजार असे बक्षीस असणार आहे. संस्थांच्या सहभागासाठीही जिल्हास्तरावर 50, 30 व 20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थांना गृहभेटी, कोविड तपासण्या करणे, मास्कचे वाटप करणे, सारी तसेच आयएलआय रुग्ण शोधणे अशी कामे असतील. याबाबत सविस्तर जाहिरात शासनस्तरावरून देण्यात येणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health survey will be conducted at every house in gadchiroli district