Amravati News: आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार उघड! डॉक्टरांनी स्वतः दवाखाना उघडून केली प्रसूती

Amravati News
Amravati News

अचलपूर : धामणगावगढी प्राथमिक आरोग्यकेंद्रातील भोंगळ कारभार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्याचे पाहायला मिळत होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. २२ मे रोजी मोथा उपकेंद्राच्या डॉक्टरांनी स्वतः दवाखाना उघडून एका महिलेची प्रसूती केली.

Amravati News
Eknath Shinde : स्पीडब्रेकर काढले आता सरकारची गाडी सुसाट... ; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी रुग्णालयात कोणीही आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हते. परिणामी प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी डॉक्टरांची धावपळ झाली. मात्र स्वतः जवळच्या औषधी वापरून सुखरूप प्रसूती केली.

चिखलदरा तालुक्यातील मोथा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मनभंग गावातील अर्चना दहिकर या महिलेला प्रसूतकळा सुरू झाल्याची माहिती मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले यांना मिळताच त्यांनी गाव गाठले.

महिलेची तपासणी केली असता प्रसूती तत्काळ करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पुढील उपचारासाठी सदर महिलेला धामणगाव आरोग्यकेंद्रात नेले. मात्र येथील दवाखाना बंद होता.

सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना गर्भवती महिला आल्याची माहिती दिली, परंतु परिचरापासून तर आरोग्यसेविका, डॉक्टरपर्यंत कोणीच आले नाही. त्यामुळे डॉ. नीता नागले यांनी स्वतः दवाखाना उघडून त्या महिलेची प्रसूती केली.

मात्र प्रसूती होईपर्यंत डॉक्टर तथा कोणतेही आरोग्य कर्मचारी हजर झाले नव्हते. त्यानंतर अर्ध्या तासाने शिकाऊ डॉक्टरसह आरोग्यसेविका हजर झाल्या, पण तोपर्यंत प्रसूती झाली होती.

या कर्मचाऱ्यांनी लगेच ही माहिती आरोग्यकेंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. माहुरे यांना दिली. त्यांनी लगेचच डॉ. नागले यांना फोन केला, मी मिटिंगनिमित्त बाहेर असून आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवितो म्हणून सांगितले.

मात्र खरोखरच डॉक्टर मिटिंगला होते काय याची चौकशी होणे गरजेचे आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच सोमवारी घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

Amravati News
Devendra Fadnavis : सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

महिलेला प्रसूतकळा तीव्र असल्याने प्रसूतीसाठी अचलपूर किंवा चिखलदरा येथे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे महिलेला दोन किलोमीटरवर असलेल्या धामणगाव आरोग्यकेंद्रात नेले.

मात्र दवाखाना बंद होता तसेच कर्मचारी नव्हते. त्यामुळे दवाखाना उघडून स्वतः प्रसूती केली. त्यानंतर कर्मचारी आले. येथील डॉक्टरांशी संपर्क साधला असता मिटिंगला गेल्याचे त्यांनी सांगितले.

-डॉ. नीता नागले

वैद्यकीय अधिकारी, मोथा उपकेंद्र.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com