विदर्भात उन्हाची लाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्यानंतर आता उन्हाची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी विदर्भात बुलडाण्याचा अपवाद वगळता सर्वच शहरांमध्ये तापमानात वाढ झाली. नागपुरात कमाल तापमानाने या मोसमातील उच्चांक गाठला, तर चंद्रपुरात संपूर्ण राज्य तसेच मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. 

प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या उष्णलाटेच्या इशाऱ्यानंतर विदर्भात जवळपास सगळीकडेच पारा एक ते तीन अंशांनी चढला. नागपूरचे कमाल तापमान 40 अंशांवरून या उन्हाळ्यातील सर्वाधिक 43.2 अंशांवर पोहोचले. विदर्भात सर्वाधिक तापमानाची चंद्रपूर येथे 44.6 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. चंद्रपूरचे तापमान विदर्भातच नव्हे, राज्य आणि मध्य भारतातही सर्वाधिक ठरले. अकोला (44.1 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (44.0 अंश सेल्सिअस) येथेही पाऱ्याने चव्वेचाळिशी गाठली. विदर्भातील इतरही शहरांमध्ये उन्हाचा कडाका जाणवला. किमान तापमानातही लक्षणीय वाढ दिसून आली. वातावरण कोरडे असल्याने येत्या दोन दिवसांत पारा आणखी चढण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. वाढते तापमान व हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या सुमारास शक्‍यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

विदर्भातील तापमान  (अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर तापमान 
चंद्रपूर 44.6 
अकोला 44.1 
वर्धा 44.0 
नागपूर 43.2 
अमरावती 43.0 
यवतमाळ 42.5 
ब्रह्मपुरी 42.0 
गडचिरोली 42.0 
वाशीम 41.6 
गोंदिया 40.8 
बुलडाणा 39.0 

Web Title: heat wave in Vidarbha