'हॉट संडे'; नागपूर @ 45.0 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

उन्हाची लाट विदर्भासह संपूर्ण देशभर दिसून येत आहे. रविवारी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थान-पाकिस्तान सीमारेषेजवळील श्रीगंगानगर येथे झाली. येथे नोंदविण्यात आलेले 46.0 अंश सेल्सिअस इतके तापमान देशात सर्वाधिक होते

नागपूर : विदर्भात सूर्यदेवाचा प्रकोप सुरूच असून, उन्हाच्या भीषण लाटेने संपूर्ण विदर्भवासी होरपळून निघत आहेत. नागपुरात रविवारी पाऱ्याने यंदाच्या उन्हाळ्यातील 45 अंशांचा नवा उच्चांक गाठताना गेल्या वर्षातील विक्रमाचीही बरोबरी साधली आहे.

रविवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 45.9 अंश इतकी करण्यात आली. तर, राजस्थानातील श्रीगंगानगर देशात सर्वांत 'हॉट' शहर ठरले. उन्हाचा तडाखा आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. 

हवामान विभागाने शनिवारी रेडअलर्ट घोषित केला होता. त्याचा तीव्र प्रभाव रविवारी विदर्भातील सर्वच शहरांमध्ये दिसून आला. नागपूरकरांसाठी रविवारचा दिवस या मोसमातील 'हॉट संडे' होता. पारा सरासरीपेक्षा चार अंशांनी चढून प्रथमच 45 अंशांवर गेला.

गेल्या वर्षी 30 एप्रिलला नागपूरचा पारा 45 अंशांवर गेला होता. दशकातील तापमानाचा विक्रम मोडीत निघण्यासाठी केवळ 0.1 अंशाची आवश्‍यकता आहे. वाढते तापमान आणि हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता दशकातील विक्रमासोबतच एप्रिल महिन्यातील सार्वकालीक विक्रमही मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 47.1 अंशांचा सार्वकालीक विक्रम 30 एप्रिल 2009 रोजी नोंदला गेला होता. 

प्रचंड उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील बहुतांश रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. जणू अघोषित संचारबंदीच अनुभवायला मिळाली. कुणीही घराबाहेर पडण्याची हिंमत केली नाही. उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी नागपूरकर स्कार्फ, दुपट्‌टे, कॅप्स, गॉगलसह अन्य सुती कपड्यांचा आसरा घेताहेत. शीतपेयाच्या दुकानांवरही गर्दी वाढली आहे. उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. 

श्रीगंगानगर देशात 'हॉट' 
उन्हाची लाट विदर्भासह संपूर्ण देशभर दिसून येत आहे. रविवारी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थान-पाकिस्तान सीमारेषेजवळील श्रीगंगानगर येथे झाली. येथे नोंदविण्यात आलेले 46.0 अंश सेल्सिअस इतके तापमान देशात सर्वाधिक होते, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक अविनाश ताठे यांनी 'सकाळ'ला दिली. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

  • नागपूर 45.0 
  • अकोला 45.0 
  • चंद्रपूर 45.8 
  • ब्रह्मपुरी 45.9 
  • वर्धा 45.0 
  • अमरावती 43.8 
  • यवतमाळ 43.5 
  • गोंदिया 44.2 
  • बुलडाणा 41.0
Web Title: Heat wave in Vidarbha; Nagpur at 45 Degree Celsius