धरण व तलावांना वरुणराजाचे "वेटिंग' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

हिंगणा(जि.नागपूर) : मॉन्सून दाखल होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. तालुक्‍यात सद्यस्थितीत सरासरीच्या 55 टक्‍के पाऊस पडला. धरण व तलावात अद्याप मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे पिण्याच्या पाणी संचयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरुणराजा केव्हा बरसणार, असा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे. 

हिंगणा(जि.नागपूर) : मॉन्सून दाखल होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. तालुक्‍यात सद्यस्थितीत सरासरीच्या 55 टक्‍के पाऊस पडला. धरण व तलावात अद्याप मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे पिण्याच्या पाणी संचयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरुणराजा केव्हा बरसणार, असा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे. 
हिंगणा तालुक्‍यात मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे. 7 जूनपासून मृगनक्षत्र सुरू झाले. रिमझिम पावसाने मॉन्सूनला सुरुवात झाली. आता अडीच महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही केवळ रिमझिम पावसातच तालुक्‍यात पडत आहे. शेतीसाठी रिमझिम पाऊस उपयोगाचा असला तरी धरण व तलावात अद्यापही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. वरुणराजाचे दमदार आगमन झाले नाही तर धरण व तलावात उपलब्ध पाणी तोकडे पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे तालुक्‍यात 13 तलाव आहेत. यापैकी कालडोंगरी, येरणगाव, वलनी, उमरी वाघ, चिचोली पठार तलावात मुबलकसाठा उपलब्ध झाला आहे. सातनवरीमधील चार तलावात 25 टक्‍के, मांडवा 47 टक्‍के, पोही 40 टक्‍के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. वेणा, दुर्गा, कृष्णा व नाग नद्यांना अद्यापही एकही पूर गेला नाही. पाटबंधारे विभागांतर्गत येणारे कान्होलीबारा बीड बोरगाव, मोहगाव झिल्पी या तलावातही जवळपास 40 टक्‍के जलसाठा झाला आहे. सन 2018 मध्ये 575.2 मिमी पावसाची सरासरी होती. शेतीपूरक पाऊस पडत असला तरी तलाव व धारणांना वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. 

मंडळनिहाय पावसाची आकडेवारी 
गावाचे नाव पाऊस मिमीमध्ये 
* हिंगणा 617.9 
*कान्होलीबारा 492.8 
*वानाडोंगरी 617.9 
*गुमगाव 622.2 
*टाकळघाट 555.9 
* अडेगाव 448.2 
*एकूण 3317.6 
*सरासरी 552.9 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavi rain.s "Waiting" for dams and lakes