पावसाने विदर्भाला झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नागपूर - विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती; पण गुरुवार मध्य रात्रीपासून त्याने नागपूरसह विदर्भात दमदार हजेरीच लावली नाही, तर अक्षरशः बदडून काढले. चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीतून मोटार पंपाचे पाइप काढताना एक शेतकरी वाहून गेला. नदीनाल्यांना आलेल्या पुराने लगतच्या वस्त्यांमध्ये व घरांमध्येही पाणी शिरले आहे. 

नागपूर शहराला तर पावसाने अक्षरशः तांडव घातले. धो धो बरसलेल्या या पावसाने साऱ्या नागपूरचे जनजीवन विस्कळित करून टाकले. सध्या नागपूर शहरात मेट्रो व रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या कामामुळे पावसाचे बरसलेले पाणी तुंबले व बहुतांश शहराला तलावाचे स्वरूप आले. नागपूर शहरात तब्बल 263 मिमी पावसाची नोंद करण्यात आली; तर त्यापाठोपाठ उमरेड तालुक्‍यातही 216 मिमी पावसाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीतून चौघे जण मोटार पंपाचे पाइप काढत होते. दरम्यान, नदीत पूर आल्याने हे चौघे वाहून गेले. मात्र, तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर शेतकरी विलास भाऊजी बोरकर वाहून गेले. 

यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांपासून पाऊस सुरू असून, 17.18 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे प्रकल्पासह विहिरींच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. 

शेतकरी सुखावला 
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. त्यामुळे कालपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. यामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे. विदर्भात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता. मात्र, अमरावतीत पावसाने फारशी हजेरी लावली नाही. तेथे केवळ ढगाळी वातावरण होते. 

Web Title: heavy rain in nagpur