ओल्या दुष्काळाचे सावट गडद, शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता

मुनेश्‍वर कुकडे 
Wednesday, 14 October 2020

हलके धानपीक काढणीला आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणीसुद्धा केली आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा शेतात आहेत. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

गोंदिया : हलक्‍या धानाच्या कडपा शेतात मळणीसाठी तयार असताना परतीच्या पावसाने जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. बुधवारीदेखील तिरोडा तालुक्‍यातील मुंडीकोटा परिसरात तसेच अन्य बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कडपा ओल्या झाल्या असून, ओल्या दुष्काळाचे नवे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत (ता.17) विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर हलक्‍या व भारी धानपिकाची लागवड केली. हलक्‍या धानपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही बहरात होते. अशातच सध्या हलके धानपीक काढणीला आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणीसुद्धा केली आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा शेतात आहेत. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

हेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी
 

आठवडाभरापूर्वी परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेकडो हेक्‍टरवरील हलक्‍या धानाच्या कडपा ओल्याचिंब झाल्या होत्या. वादळवाऱ्यामुळे भारी धानालाही चांगलाच फटका बसला. हे धान जमिनदोस्त झाले. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दरम्यान, आज, बुधवारी तिरोडा तालुक्‍यातील मुंडीपार व परिसरात तब्बल अर्धा तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची धावाधाव झाली. मळणी केलेले धान ओले होऊ नये, म्हणून ताडपत्री झाकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. याच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या कडपा शेतात आहेत. या कडपादेखील ओल्याचिंब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. 

सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे सर्वेक्षण करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains expected in Gondia district till Saturday