अबब! भेंडीने मोडले सगळे रेकॉर्ड; रोपांची उंची तब्बल १२ फूट.. वाचा सविस्तर

मिलिंद उमरे 
Sunday, 6 September 2020

सालईटोला गावाच्या वेशीवरच घर असलेले अशोक सुत्रपवार यांचा केशकर्तनाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांना वृक्षांची आवड आहे. त्यामुळे त्यांच्या घरी अर्जुन, मोह, तेंदू, आंबा अशा वृक्षांसोबतच उसाची लागवड केली आहे.

गडचिरोली : भेंडी ही क्षुप म्हणजे झुडूप प्रकारातील वनस्पती असून तिची उंची फार फार, तर कंबरेपर्यंत असते. मात्र, येथून जवळच असलेल्या सालईटोला गावात राहणाऱ्या अशोक सुत्रपवार यांच्या अंगणातील भेंडीच्या रोपाने भेंडीबद्दलचे सगळे गैरसमज फाट्यावर बसवत चक्‍क बारा फुटांची उंची मिळवली आहे. त्यामुळे बारा फुटांचे हे ताडमाड उंच भेंडीचे रोप बघण्यासाठी अनेकजण त्यांच्या घरी येत असतात.

सालईटोला गावाच्या वेशीवरच घर असलेले अशोक सुत्रपवार यांचा केशकर्तनाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांना वृक्षांची आवड आहे. त्यामुळे त्यांच्या घरी अर्जुन, मोह, तेंदू, आंबा अशा वृक्षांसोबतच उसाची लागवड केली आहे. शिवाय टोमॅटो, वांगे, मिरची, पालक, मेथी, दोडके आदी भाजीपालाही ते घरातील भव्य अंगणात लावत असतात. त्यांच्या घराचे अंगणच जवळपास अडीच ते तीन हजार चौरस फूट असल्याने येथे त्यांना विविध वनस्पती व वृक्षांची लागवड सहज करता येते.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

उन्हाळ्यात त्यांनी सहज म्हणून भेंडीची लागवड केली. अंगणात त्यांनी बियाणे पेरून भेंडी उगवली. त्यातील काही रोपे त्यांच्या इलेक्‍ट्रिक बोअरींगजवळ उगवली होती. पूर्वीचे शेत असलेली कसदार माती व बोअरींगचे सतत मिळणारे पाणी यामुळे या रोपांचे चांगलेच पोषण झाले. यातील एका रोपाने मात्र कमालच केली. ते इतर रोपांच्या जवळपास तिप्पट वाढले आहे. कुणाचाही हे रोप बघितल्यावर विश्‍वास बसत नाही. पण, जवळ जाऊन या रोपाला लागलेली भेंडी बघितली की, विश्‍वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते. 

अशोक सुत्रपवार व त्यांचा मुलगा विजय सुत्रपवार यांना वृक्षलागवडीसोबतच कुक्‍कुटपालनाचीही आवड आहे. त्यामुळे त्यांनी विविध प्रजातीच्या देशी कोंबड्या पाळल्या आहेत. त्यात कोंबडबाजारात झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या सावज प्रजातीच्या कोंबड्यांचाही समावेश आहे. या भेंडीच्या झाडापासून भाजीसाठी भरपूर भेंड्या मिळत असून लोकांना या झाडाचे कौतुक वाटत असल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष

रताळीही लावली

अनेकजण अंगणात किंवा परसबागेत भाजीपाला लागवड करत असले, तरी रताळ्याची लागवड घरी सहसा कुणी करत नाही. त्यासाठी परीश्रमही भरपूर घ्यावे लागतात. पण, सुत्रपवार यांनी आपल्या अंगणात रताळ्याचीही लागवड केली आहे. त्याची रोपे हातभर उंच झाली असून अंगणातच आपल्याला याचे भरपूर पीक मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The height of okra plant is more than 12 feet