मित्राच्या मदतीने पत्नीवरच जादूटोणा, पती व मांत्रिकास अटक 

संतोष ताकपिरे 
Wednesday, 28 October 2020

जादूटोणा करणाऱ्या कथित मांत्रिकाने 40 वर्षीय महिलेची छेडखानी केल्याचा आरोप फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला.

अमरावती : पत्नीच्या अंगात काही तरी घुसले, ते बाहेर काढण्यासाठी मित्राच्या मदतीने एकाने मांत्रिकाला बोलविले व पत्नीवर जादूटोण्याचा प्रयोग केल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत महादेवखोरी भागात घडली. 

जादूटोणा करणाऱ्या कथित मांत्रिकाने 40 वर्षीय महिलेची छेडखानी केल्याचा आरोप फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत करण्यात आला. पोलिसांनी या तक्रारीवरून मांत्रिक राजू गणेश गुडधे (रा. पंचशीलनगर, वडरपुरा) विरुद्ध जादूटोणा कायद्यासह विनयभंग प्रकरणी तर, या प्रकरणात सहभागी पतीविरुद्ध बुधवारी (ता. 28) गुन्हा दाखल केला. 

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
 

पीडितेचे चौदा वर्षांपूर्वी लग्न झाले असून, पती रंगकाम करतो. लग्नानंतर त्यांना दोन अपत्य झाली.  मंगळवारी (ता. 27) सकाळी सातच्या सुमारास पीडित महिला घरी असताना पतीसह संशयित आरोपी मांत्रिक राजू गुडधे घरी गेला. पीडितेच्या पतीने मुलीला तिच्या आईच्या अंगात काही तरी घुसले, ते बाहेर काढण्यासाठी हळदीचे पाकीट आणण्यास सांगितले. मुलीने हळद आणून पती व सोबत असलेल्या मांत्रिकाजवळ दिली. 

मांत्रिक राजूने पीडितेला स्वत:च्या समोर बसविले. सोबत तांब्याचा गडवा, हळद, कुंकू, लिंबू, अगरबत्ती, धूपबत्ती, तुळशीची पाने, पूजेसाठी आणले होते. पतीसमक्ष मांत्रिक राजूने पीडित महिलेच्या अंगाला आधी हळद लावली. हळद लावताना, काही मंत्रही म्हटले. हळद लावल्यानंतर लिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतरच अंगात आलेली देवी बाहेर जाईल. असा सल्ला पिडीतेला दिला.

राजू गुडधेला विरोध केल्यानंतरही त्याने इच्छेविरुद्ध अंगाला हळद लावली. असा आरोपी महिलेने फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. शिवाय पीडितेला जीवे मारण्याचीही धमकी दिली. घटनेची वाच्यता बुधवारी (ता. 28) पीडितेने नातेवाईकाजवळ केली. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यात पती व मांत्रिकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पीडित महिलेने केली. 
 

प्रकरण गंभीर 
प्रकरण गंभीर असल्यामुळे त्याचा बारकाईने तपास करून, तथ्य बाहेर काढले जाईल.
-ज्योती बडेगावे, पोलिस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.
 
संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of a friend husband blackmagic to wife