बर्ड फ्लूची धास्ती; पांढरकवड्यात असंख्या कोंबड्यांचा मृत्यू, रोगाविषयी माहिती नसल्याने फेकल्या इतरत्र

सतीश पुल्लजवार
Tuesday, 12 January 2021

अज्ञात रोगाविषयी कसलीही कल्पना नसल्यामुळे मराठवाकडीमध्ये कोंबड्यांना इतरत्र फेकण्यात आले. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल अजून तरी काहीच पुष्टी झाली नाही

पांढरकवडा (जि. यवतमाळ) :  कोरोनाचे संकट कायम असताना आता बर्ड फ्लूमुळे दक्षता घेण्यात येत आहे. तालुक्‍यातील लिंगटी (सायखेडा), मराठवाकडी गावातील असंख्य कोंबड्या अचानकपणे मृत्युमूखी पडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पशूसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमूने तपासणीसाठी घेतले आहे.

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता बर्ड फ्लूचा धोका निर्माण झालेला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात या राज्यात मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाहता पाहता बर्ड फ्लूने राज्यातदेखील पाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्‍यातील लिंगटी(सायखेडा) येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या दोनशे कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला असून, राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाकडी गावातील कोंबड्याही मृत्यूमुखी पडल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने लिंगटी (सायखेडा) येथील पाच कोंबड्यांचे नमुने तपासणीकरिता घेतले आहे. मराठवाकडी गावातील समस्या गंभीर नसल्याचे कारण देत नमूने घेतले नाही. दरम्यान, अज्ञात रोगाविषयी कसलीही कल्पना नसल्यामुळे मराठवाकडीमध्ये कोंबड्यांना इतरत्र फेकण्यात आले. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल अजून तरी काहीच पुष्टी झाली नाही.

हेही वाचा -  वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

जिल्हा प्रशासन अलर्ट -

राज्यातसुद्धा काही ठिकाणी कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात पोल्ट्री फार्म असलेल्या नागरिकांची माहिती तातडीने घेऊन त्यांच्या संपर्कात संबंधित अधिकाऱ्यांनी राहावे. प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना त्वरीत माहिती द्यावी. तसेच डॉ. क्रांती काटोले, डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hens are died in pandharkawada of yavatmal bird flu news