काय सांगता! येथे चक्क पाण्यात पोहतात कोंबडे...काय आहे याच्या मागचे कारण...वाचा सविस्तर

मिलिंद उमरे
Saturday, 5 September 2020


कोंबडा हा पक्षी फार तर आकाशात उडू अन् पाण्यात पोहूही शकत नाही. कारण त्याचे पंख लहान असतात आणि वजन जास्त असल्यामुळे त्यांना फारवेळ पोहताही येत नाही. परंतु गडचिरोली जिल्ह्यात असे काही कोंबडे आहेत की ते पाण्यात चांगलेच पोहू शकतात. कोंबड्यांना पोहण्याचे कसब त्यांच्या मालकांनीच शिकवले आहे. या मागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊ या.

गडचिरोली : कोंबडा आणि पाण्याचा तसा संबंध फक्त पिण्यापुरता आहे. पण, गडचिरोली जिल्ह्यातील कोंबडे चक्‍क पाण्यात पोहतात. खरेतर त्यांचे मालकच त्यांना झुंजीत अधिक काळ लढण्यासाठी हे विशेष प्रकारचे प्रशिक्षण देत असतात. गडचिरोली जिल्ह्यात कोंबडबाजार मोठ्या संख्येने भरतो. त्यामुळे खास झुंजीसाठी कोंबडे पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

कोंबडबाजारात कोंबड्यांच्या पायांना धारदार काती बांधली जाते. त्यानंतर गोल रिंगणात हे कोंबडे प्राणपणाने झुंजतात. आजूबाजूला जमलेले लोक चिअर लिडर्सच्या भूमिकेत शिरत प्राणांतिक लढणाऱ्या कोंबड्यांना प्रोत्साहन देत असतात. यात दोनपैकी एका कोंबड्याचा लढता-लढता मृत्यू होईपर्यंत ही झुंज चालते. या झुंजीवर लाखो रुपयांचे डाव लागतात. ज्याचा कोंबडा जिंकला त्याला पैशांसोबतच हरून मेलेला कोंबडाही मिळतो. त्यामुळे पैसे आणि सोबत चिकन पार्टी वेगळी.
 

मालक हौसेने पाळतात कोंबडे

म्हणून या खेळात हौसेने सहभागी होणारे खूप असतात. मात्र, हे झुंजीचे कोंबडे साधारण कोंबड्याप्रमाणे नसतात. त्यांच्या किमतीही काही हजारांच्या घरात असतात. शिवाय झुंजीसाठी कोंबडे पाळत असले; तरी मालक त्यांना खूप जीव लावतात. त्यांची सगळी बडदास्त ठेवली जाते. अधूनमधून काती न लावता दुसऱ्या कोंबड्यांशी झुंज लावून दमखम जोखला जातो. झुंजीत कोंबड्याची शारीरिक क्षमता उत्तम हवी म्हणून त्याला अनेक प्रकारचे व्यायाम देतात. त्यात कोंबडा पोहणी लावणे, हा एक महत्त्वाचा व्यायाम असतो. यालाच इकडे "दम जिरवणे' म्हणतात.

अर्धा तास विशेष व्यायाम

जलतरण हा जगातील सर्वांत उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे शरीर लवचिक होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व ताकदही वाढते. म्हणून कोंबडे मालक सकाळीच आपल्या कोंबड्यांना जवळच्या तलावात घेऊन जातात. कोंबडा हातात धरून तलावात वीस ते तीस फुटांपर्यंत दूर फेकतात. बिचारे कोंबडे पाण्याने भिजताच कसेबसे पोहत मालकापर्यंत पोहोचतात. मालक पुन्हा त्यांना पाण्यात फेकतो. जवळपास वीस मिनिटे ते अर्धा तास हा विशेष व्यायाम कोंबड्यांना देण्यात येतो. त्यामुळे कोंबड्याची जिंकण्याची शक्‍यता अधिक वाढते, असा अनेक कोंबडेमालकांना विश्‍वास आहे.

जाणून घ्या :  क्या बात है! विदर्भाची हिरवी कंच मिरची निघाली परदेशवारीला; बाजार पुन्हा फुलले

कोंबड्यांना स्पेशल डाएट…

आपल्याकडे खेळाडू, व्यायामपटूंना स्पेशल डाएट असतो. तसाच झुंजीच्या कोंबड्यांनाही डाएट असतो. त्यांना उत्तम प्रकारचे धान्य व विविध प्रकारच्या विटामिन्सच्या गोळ्याही देण्यात येतात. आयुर्वेदिक दुकानांत मिळणारी लोहभस्मासारखी औषधे देतात. शिवाय काहीजण मेलेल्या कोंबड्याचे पित्त आणि मांसही खाऊ घालतात. त्यामुळे कोंबडे अधिक आक्रमक व शक्तिशाली होतात, असा समज आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hens swim in the water at gadchiroli