आयपीएस होण्याचे आहे तिचे स्वप्न; जलतरणासोबतच अभ्यासातही दाखविली चमक... 

bhaki kalmegh
bhaki kalmegh

अमरावती : पहाटे दीड तास मैदानी तर सायंकाळी दोन तास जलतरणाचा सराव, "खेलो इंडिया'साठी झालेली निवड, राज्यस्तरीय स्पर्धेत तीन पदके, राष्ट्रीय शिबिर, राष्ट्रीय स्पर्धेसाठी खर्ची घातलेला वेळ या सर्वच बाबी डोळ्यांपुढे ठेवल्या तर इयत्ता दहावीच्या परीक्षेत ती उत्तुंग भरारी घेईल, असे क्षणभर वाटत नव्हते. पण तिने जलतरण तलावासोबतच अभ्यासात सुद्धा आपली चमक दाखवून दिली. 

भक्ती आशीष काळमेघ असे या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्येचे नाव. वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी. पण मुलीच्या सरावाच्या वेळी ही माऊली तासन्‌तास मैदानावर तसेच जलतरण तलावावर तिच्यासोबत हजर राहत होती. भक्तीनेही दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण प्राप्त करून आई-वडिलांनी घेतलेली मेहनत साकार केली. 

भक्ती ही अमरावतीच्या समर्थ हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. वडील आशीष काळमेघ सतत काळ्या मातीत राबणारे व्यक्ती. परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा वडील सुद्धा आपल्या मुलीसोबत मैदानावर, स्पर्धेच्या, प्रशिक्षणासाठीच्या कॅम्पच्यावेळी तिच्यासोबत हजर राहायचे. 2019-2020 चे शैक्षणिक सत्र सुरू झाले. तेव्हाच ती जलतरण संघटनेद्वारा गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी झाली. त्यानंतर राष्ट्रीय कॅम्पसाठी तब्बल एक महिना मुंबईत तिला थांबावे लागले. तेथून ती पुण्यातही कॅम्पसाठी गेली. नागपूर येथे आयोजित गतवर्षीच्या शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भक्तीने ब्रेसस्ट्रोक प्रकारात दोन सिल्व्हर व एक कांस्य अशा तीन पदकांची कमाई केली. त्यापूर्वी भक्तीने 2018-2019 मध्ये इयत्ता नववीत असताना, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत (14 वर्षे आतील गटात) सुवर्ण पदक प्राप्त केले. शालेय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अमरावतीला तब्बल पंधरा वर्षानंतर मिळालेले जलतरणातील ते पहिले सुवर्णपदक ठरले. 

भक्तीला आयपीएस व्हायचे आहे. पहिली महिला आयपीएस किरण बेदी या तिच्या आदर्श असल्याचे तिने सांगितले. भक्तीची लहान बहीण दीप्ती ही सुद्धा मोठ्याच बहिणीला आदर्श मानते. तिनेही सातव्या वर्गात असताना गतवर्षी 14 वर्षे वयोगटात पहिल्यांदाच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. परीक्षेच्या एक महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आसाम येथे "खेलो इंडिया'ची स्पर्धा झाली. त्यातही भक्ती महाराष्ट्रातच्या संघात सहभागी होती. 

आईवडील व गुरुजनांनी दिले बळ 

एकीकडे जलतरण स्पर्धा, नेहमीचे प्रशिक्षण कॅम्प तर, दुसरीकडे दहावीची बोर्डाची परीक्षा हे संतुलन कायम राखताना आईवडिलांनी दिलेली साथ, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सर्व जलतरण प्रशिक्षकांचाही यशात वाटा असल्याचे भक्तीने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com