Gadchiroli : हत्तींचा कळप अर्जुनीच्या जंगलात; ११ घरांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्तींचा कळप अर्जुनीच्या जंगलात; ११ घरांचे नुकसान

हत्तींचा कळप अर्जुनीच्या जंगलात; ११ घरांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ऑक्टोबरपासून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या १८ ते २२ हत्तींच्या कळपाने गेल्या काही दिवसांचा कवडीकसा गावाजवळील जंगलातील मुक्काम हलवून आता अर्जुनी गावातील जंगलाकडे कूच केले. या कळपाने सोमवारी (ता. १५) रात्रीच्या सुमारास अर्जुनी गावातील ११ घरांचे नुकसान केल्याची माहिती गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांनी आज (ता. १६) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: २६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; शोधमोहीम सुरूच

डॉ. कुमारस्वामी म्हणाले, १६ ऑक्टोबर २०२१ रोजी अंदाजे १८ ते २२ च्या संख्येने हत्तीचा कळप चारवाही उपक्षेत्रातील मर्मा, ग्यारापत्ती उपक्षेत्रातील बोटेझरी, भिमनखोजी, देवसूर या भागातून भ्रमण करीत १७ ऑक्टोबरला चारवाही उपक्षेत्रातील मर्मा, सुरसुंडी उपक्षेत्रातील आंबेझरी या मार्गातून १८ ऑक्टोबरला फुलकोडो क्षेत्रात आला.

१९ ते आज १६ नोव्हेंबरपर्यंत हा कळप पश्चिम मुरूमगाव, दक्षिण धानोरा व उत्तर धानोरा वनपरिक्षेत्राच्या सीमेलगत असलेल्या दक्षिण धानोरा परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५८०, ५७९, ५७८, ५७७ व पश्चिम मुरूमगाव परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६३१, ६३२, ६३३ या क्षेत्रात वावरत आहे. क्षेत्रात पश्चिम दिशेने येरकड ते मालेवाडा मार्ग, दक्षिण दिशेने येरकड ते मुरूमगाव मार्ग व पूर्व दिशेने मुरूमगाव ते मालेवाडा मार्ग लागून आहे. या क्षेत्रात हत्तींचा कळप आजपर्यंत अंदाजे १००० ते १२०० हेक्टर क्षेत्रामध्ये भ्रमंती करीत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हत्ती कन्हाळगाव, भोजगाटा, कवडीकसा परिसरातील जंगलात फिरत होते. त्यानंतर त्यांनी अर्जुनी गावाकडे मोर्चा वळविला आणि सोमवारी घरांचे नुकसान केले. खाणकाम आणि इतर अडथळ्यांमुळे ओडिसातील हिराकुंड जलाशयाजवळील क्षेत्रातून हत्तींच्या कळपाने त्यांचा अधिवास सोडल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

अशी घेतली जाते काळजी

नागरिकांना इजा होऊ नये व हत्तींना त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. प्रशिक्षण व सभांच्या माध्यामातून माहिती दिली जात आहे. दिवसभर हत्तींच्या हालचाली व इतर माहिती सुरक्षित अंतर ठेवून गोळा केली जाते. गावकऱ्यांना पथदिवे, ब्लँकेट, मशाल आदींचे वाटप केले आहे. फटाके, मशाली, ढोल आदींची तयारी केली आहे. पीकनुकसानीच्या आतापर्यंतच्या ६९ प्रकरणांत ७ लाख ९७ हजार ८०५ आर्थिक साहाय्य संबंधित शेतमालकांना देण्यात आले आहे.

२२ इमारतींचे नुकसान...

हत्तींच्या कळपाकडून आतापर्यंत २२ इमारतींचे नुकसान झाले. यात २० ऑक्टोबर २०२१ रोजी मुंजालगोंदी गावातील ३ इमारती, ४ नोव्हेंबर २०२१ ला भोजगाटा गावातील ५ इमारती, १० नोव्हेंबर २०२१ ला फुलकोडो गावातील ३ इमारती, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्जुनी गावातील ११ इमारतींचा समावेश आहे.

loading image
go to top