उघड्या जमिनीमुळे वाढलाय अकोल्याचा ताप! 

अनुप ताले  
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अकोला : जिल्ह्यात उन्हाळी पिके लुप्त होत आहेत तसेच जंगलही नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या परिसरात बहुतांश जंगले व शेते उघडी पडली असून, दरवर्षीच या दिवसात जमीन ओसाड पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच राज्यात नव्हे तर, जगभरात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

अकोला : जिल्ह्यात उन्हाळी पिके लुप्त होत आहेत तसेच जंगलही नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या परिसरात बहुतांश जंगले व शेते उघडी पडली असून, दरवर्षीच या दिवसात जमीन ओसाड पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच राज्यात नव्हे तर, जगभरात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

१९८० च्या पूर्वी जिल्ह्यातील तापमानाचा आढावा घेतल्यास, येथे उन्हाळ्यात सर्वाधिक ३५ ते ४० च्या दरम्यान तापमानाची नोंद झाल्याचे दिसून येते. त्यावेळी जिल्ह्यातील जंगली प्रदेश अधिक होता तर, उन्हाळ्यातही शेतामध्ये पिके उभी असल्याने, हिरवळ असायची. नद्यांना पाणी असायचे आणि भूजल पातळही उंचावलेली असायची. त्यामुळे विहिरींना काठोकाठ पाणी दिसून यायचे. मात्र दिवसागणिक परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गरजेनुसार उद्योग थाडले गेले. काॅंक्रिटीकरण वाढले आणि जंगलतोड होऊन वृक्ष संपदा नष्ट व्हायला लागली. पीक उत्पादनातून आर्थिक स्थैय मिळत नसल्याने व शेती नुकसानात जात असल्याने शेतकरी, उद्योग व नोकरीकडे वळला. त्यामुळे जिल्ह्यात आता रब्बी व खरिपातही अनेक शेत ओसाड पडल्याचे दिसून येत आहेत. उन्हाळी पिके तर लुप्तच झाली आहेत, त्यामुळे ९८ टक्के शेतीचा भाग मार्चपासून उघडा पडल्याचे दिसत आहे. जलगतोड प्रचंड झाल्याने जिल्ह्याचे कवच असलेले अभयारण्येसुद्धा उघडी पडली असून, चारही बाजूने सूर्याची तिव्र किरणे व उष्ण वारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. वृक्षसंपदा नष्ट झाल्याने, पावसाचे प्रमाणही कमी झाले आणि पर्यायाने जमिनीतील ओल संपली, जलस्त्रोत आटले व ओसाड पडलेली काळी जमीन सूर्याच्या तिव्र किरणांनी संतापला लागली. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेची लाट येत असून, उच्चांकी तापमानाची नोंद होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

२१ मार्चनंतर सूर्याचा विषुववृत्तापासून कर्कवृत्ताकडे प्रवास सुरू झाला आणि यावेळी सर्वाधिक हिट भारतीय उपमहाद्विपावर येत आहे. सूर्याची स्थिती बरोबर भारताच्या वर असून, २१ जूनला तो कर्कवृत्तावर पोहचेल. अकोल्यात सध्या बहुतांश शेत जमीन तसेच जंगलेही उघडी पडली आहेत आणि उघड्या जमिनीपासून निघणारे रेडिएशन उष्णता निर्माण करतात. काळीजमीन उष्णता धरुण ठेवते, त्यामुळे अकोला व परिसरात उष्णतेची लाट येत असून, तापमानात दरवर्षी वाढ होत आहे. 
- संजय अप्तुरकर, सहयोगी वैज्ञानिक, 
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर. 

वाढत्या तापमानावर कसा लागेल ब्रेक 
- वृक्ष तोड थांबविणे 
- वृक्ष लागवड व संवंर्धन 
- पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन 
- पाण्याच्या वापराचे नियोजन 
- उन्हाळी पिकांचे आच्छादन वाढविणे 
- शोषखड्डे निर्माण करणे 
- औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्ष लागवड

Web Title: High temperature at Akola