esakal | हायव्होल्टेज निवडणूक उद्या; दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत
sakal

बोलून बातमी शोधा

amravati

हायव्होल्टेज निवडणूक उद्या; दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी सोमवारी (ता. चार) सकाळी 8 ते 5 यादरम्यान मतदान होणार आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेल विरोधात सहकार पॅनेल अशी लढत होत असून दिग्गजांच्या एन्ट्रीने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. एकमेकांना आव्हान देत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत चुरशीच्या या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. पाच) लागणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांत दोन्ही पॅनेलकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. मतदार हे आरोप कशाप्रकारे घेतात यावर उद्याच्या निवडणुकीचा फैसला अवलंबला आहे. दरम्यान दोन्ही पॅनेलने विजयाचा दावा केला आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील सेवा सहकारी संस्थांच्या 605 मतदारांसह क 1 मधील 581 व क 2 मधील 501, असे 1687 मतदार आहेत. अमरावती तालुक्यातील 435, भातकुली तालुक्यातील 58, नांदगावखंडेश्वर 56, चांदूररेल्वे 42, धामणगावरेल्वे 64, तिवसा 70, मोर्शी 92, वरुड 120, अचलपूर 167, दर्यापूर 262, चांदूरबाजार 124, अंजनगावसुर्जी 150, चिखलदरा 24 व धारणी तालुक्यातील 23 मतदार मतदान करतील. संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी मतदानकेंद्र निश्चित करण्यात आले आहे.

बँकेचे 21 सदस्यीय संचालक मंडळ असून चार संचालक बिनविरोध निवडून आले. यामध्ये नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पटेल, अभिजित ढेपे व सुरेश साबळे यांचा समावेश आहे. 17 संचालकपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथमच मंत्री व आमदारांची एन्ट्री झाल्याने ती लक्षणीय झाली आहे.

परिवर्तन पॅनेलकडून राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार राजकुमार पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके तर सहकार पॅनेलकडून आमदार बळवंत वानखडे, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांची उमेदवारी असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. अमरावती, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, अंजनगावसुर्जी, चिखलदरा या सेवा सहकारी मतदारसंघासह इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या आठ जागांवरील निवडणूक एकास एक असल्याने अधिक लक्षवेधी बनली आहे.

चांदूरबाजार, चांदूररेल्वे, अमरावती संवेदनशील ?

चांदूरबाजार तालुक्यातून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात बबलू देशमुख तर चांदूरातून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय ओबीसी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय खोडके विरुद्ध बबलू देशमुख अशी लढत असल्याने हे मतदारसंघ संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात येणार आहे.

हेही वाचा: प्रेयसीच्या इच्छेविरुद्ध केला दोन वेळा गर्भपात

मतदानाचे साहित्य रवाना

रविवारी दुपारी सर्व मतदानकेंद्रांवरील कर्मचा-यांना गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातून मतपत्रिका तसेच अन्य साहित्य देण्यात आले. एका केंद्रावर पाच या प्रमाणे 14 तालुक्यांतील केंद्रांवर एकूण 70 कर्मचारी राहतील. त्यांच्या दिमतीला पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा राहणार आहे.

मतमोजणीकडे राहणार लक्ष

मंगळवारी (ता.5) सकाळी 8 पासून संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातील सभागृहात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी 14 टेबल्स राहणार असून प्रत्येक टेबलवर मतगणणेसाठी 3 असे एकूण 42 कर्मचारी राहतील. सुरुवातीला सर्व 14 तालुक्यांतील मतपेट्या एकत्रित करून त्यांची मोजणी केली जाईल व नंतर जिल्हास्तरावरील मतमोजणी केली जाणार आहे. संवर्गनिहाय 25 -25 मतपत्रिकांचे गट्ठे बांधले जातील. दुपारी 1 ते 2 पर्यंत जिल्हा बँकेचे शिलेदार कोण? हे ठरणार आहे.

loading image
go to top