नक्‍की वाजणार का उच्च माध्यमिक शाळांची घंटा?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

दरवर्षी 26 जूनपासून शाळा सुरू होत होत्या. त्यामुळे दुर्गम गावांतील विद्यार्थी चार ते पाच दिवसांआधीच आपल्या वसतिगृहात हजर होत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे. जिल्हा प्रशासनाने उच्च माध्यमिक विद्यालय एक जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

गडचिरोली : कोरोना संकटामुळे शाळांचे वेळापत्रक अस्ताव्यस्त झाले आहे. शाळा सुरू होणार की नाही, असा संभ्रम असतानाच जिल्ह्यात उच्च माध्यमिक शाळा बुधवार (ता. 1) पासून सुरू होणार असल्याचे नक्‍की झाले आहे. मात्र, पालकांत अजून संभ्रमाची स्थिती आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाळ्याच्या दिवसांत तीन ते चार महिने गावाबाहेर पडता येत नाही. त्यामुळे निवासी शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. या समस्येची चिंता आश्रमशाळा तसेच निवासी शाळांतील शिक्षकांना सतावते आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत पुलाअभावी वाहतुकीची समस्या भेडसावते. दुर्गम भागांत नदी व नाल्याच्या पुरामुळे शेकडो गावे दोन ते तीन महिने तालुका मुख्यालयाच्या संपर्कापासून दूर असतात. दुर्गम भागांत उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थी तालुका व जिल्हा मुख्यालयात निवासी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. याशिवाय आश्रमशाळांत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांचीही संख्या बऱ्यापैकी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा व धानोरा या तालुक्‍यांत पावसाळ्याच्या दिवसात नदी, नाल्याच्या पुराचा अडथळा येतो.

दरवर्षी 26 जूनपासून शाळा सुरू होत होत्या. त्यामुळे दुर्गम गावांतील विद्यार्थी चार ते पाच दिवसांआधीच आपल्या वसतिगृहात हजर होत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे. जिल्हा प्रशासनाने उच्च माध्यमिक विद्यालय एक जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु कित्येक शाळांमध्ये प्रवासी लोकांना क्वारंटाईन केलेले आहे तर जिथे इमारती रिकाम्या झाल्या तेथे निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पालकांसोबतच विद्यार्थीही संभ्रमात आहेत. 26 जूनपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या मात्र, विद्यार्थी नसल्याने शिक्षक गावागावांत जाऊन पालकांशी संवाद साधून कोरोनाच्या समस्येबाबत त्यांचे मत जाणून घेत आहेत.

सविस्तर वाचा - नियम सांगणारे मुंढे नियमबाह्य का वागतात? महापौरांचा सवाल, वाचा विशेष मुलाखत

सविस्तर वाचा - नियम सांगणारे मुंढे नियमबाह्य का वागतात? महापौरांचा सवाल, वाचा विशेष मुलाखत

शिक्षकांना विद्यार्थ्यांची चिंता
कोरोनाच्या संकटामुळे यंदा प्राथमिक शाळा पुढील महिन्यात सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. इंग्रजी शाळांनी अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, दुर्गम भागात इंटरनेट सेवेची समस्या आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल नसल्याने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. आश्रमशाळा तसेच निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन स्वतः शिक्षक त्यांना शाळेत आणतात. परंतु यंदा पावसाळ्यामुळे विद्यार्थ्यांना आणणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची चिंता सतावते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher middle schools start from tomorrow