घरोघरी शोधणार मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रणासाठी नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून उपचार केले जातील. मार्च 2020 पर्यंत उच्च रक्तदाबाचे 11 लाख तर मधुमेहाच्या 3 लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संशोधनानुसार 30 वर्षांवरील व्यक्तीपैकी 7 टक्के नागरिक मधुमेह तर 25 टक्के लोकं उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. शिवाय गुणवत्तापूर्ण औषधांच्या अभावामुळे 90 टक्के रुग्णांचा औषधोपचार खंडित होतो. या अभियानांतर्गत जागतिक आरोग्य संघटना व राज्य शासनाद्वारे निर्धारित उपचार पद्धतीने रुग्णांना औषधी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रणाद्वारे हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंडाचे विकार आणि रेटीनोपॅथी यासारख्या आजारांवर 50 टक्के नियंत्रण मिळविणे अपेक्षित आहे.
आरोग्य विभागातील एएनएम व आशा घरोघरी जाऊन प्रौढ व्यक्तींचे रक्तदाब व रक्तशर्करेची तपासणी करतील. संशयित रुग्णांची प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे तपासणी करून 30 दिवसांची औषध दरमहा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
43.43 लाखांहून अधिक व्यक्तींची तपासणी
विभागातील 254 ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र, 67 नागरी आरोग्य केंद्र, दीड हजार आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांमधून तपासणी केली जाणार आहे. दीडवर्षात एकूण 43.43 लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात ही संख्या आखणी वाढणार आहे. रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासह मानसिक ताण कमी करण्यासाठी समुपदेशन, योग व सतत देखरेखीवर लक्ष दिले जाणार आहे.
उच्च रक्तदाबाचे 52 हजार रुग्ण आढळले
वर्धा व भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर भारतीय उच्च रक्तदाब नियंत्रण कार्यक्रम नोव्हेंबर 2018 पासून तसेच राष्ट्रीय कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात नियंत्रण कार्यक्रम एप्रिल 2018पासून राबविण्यात येत आहे. या योजनांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन उच्चरक्तदाब व मधुमेह नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत उच्च रक्तदाबाचे 52 हजार तर मधुमेहाचे 4 हजार 64 रुग्ण आढळून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com