esakal | गृहमंत्री अनिल देशमुखांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Home minister Anil deshmukh celebrated diwali with police in Gadchiroli

अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. या वेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते. 

गृहमंत्री अनिल देशमुखांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवानांचे मनोबल वाढविले. देशमुख यांनी सपत्नीक शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमल येथे भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. या वेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते. 

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

दिवाळीच्या निमित्ताने प्रथमय गृहमंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला, नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. 

या वेळी बोलताना देशमुख म्हणाले की, भावनेपेक्षा कर्माला प्राधान्य देणाऱ्यांना दिवाळी सणाचा आनंद कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलिस घरापासून, आपल्या आई-वडीलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असतात, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की, मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलिस दल कर्तव्यावर असताना मी माइया घरात माझ्या पत्नी-मुलांसह दिवाळी साजरी करत बसलो असतो, तर माझ्या मनाला रूखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्यामध्ये यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा. .

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

गडचिरोली पोलिस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले की, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृहमंत्र्यांनी हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देत पोलिसांच्या इतर अडचणी समजून घेत सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ