कोरोनामुळे झाला होम क्वारंटाइन...अन्‌ मग घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणासाठी मजुरांना ठेवण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाइनचा त्रास असह्य झाल्याने शुक्रवारी (ता. 22) रात्री मजूर श्री. अंगारे यांनी शाळेच्या जवळ असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावती : तालुक्‍यातील पिंपरी गावातील कोरोनामुळे होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 23) उघडकीस आली. ज्ञानेश्‍वर काशिनाथ अंगारे (वय 32), असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

 

पिंपरी येथील मूळ रहिवासी अंगारे हे काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगावखंडेश्‍वर येथे गेले होते. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित झाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून ते नांदगावखंडेश्‍वर येथेच अडकून पडले होते. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अडकून पडलेल्या मजुरांना प्रशासनाने वाहनाने स्वगृही पाठविले.

 

होम क्वारंटाइनचा त्रास

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन, असा शिक्का मारून गावी पाठविले. पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणासाठी त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाइनचा त्रास असह्य झाल्याने शुक्रवारी (ता. 22) रात्री श्री. अंगारे यांनी शाळेच्या जवळ असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात

शनिवारी (ता. 23) सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. मोर्शी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठविला, असे पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी स्पष्ट केले. मृताच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

जाणून घ्या : ती गालातल्या गालात हसत वाट बघू लागली, पण कोणीच प्रतिसाद दिला नाही

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट
सदर व्यक्ती चारच दिवसांपूर्वी पिंपरी येथील शाळेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली.
- संजय सोळंके, पोलिस निरीक्षक, मोर्शी ठाणे, जि. अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine man commits suicide in Amravati