नागपूर : मगरीशी झुंज देऊन दुचाकीने गाठले रुग्णालय

जखमी भीमराव मडकामी
जखमी भीमराव मडकामी

भामरागड - मौजमस्ती म्हणून नदीत अंघोळ करणे कधी-कधी जिवावर बेतल्याच्या अनेक घटना आजपर्यंत पाहिल्या आहेत. मात्र, अशा घटनांतून साहसाने सुटका करून घेणारी घटना इंद्रावती नदीच्या पात्रात घडली. त्या साहसवीराचे नाव आहे भीमराव दसरू मडकामी. रविवारी ते इंद्रावती नदीत अंघोळ करायला गेले आणि अचानक त्यांच्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्याने भांबावून गेलेल्या भीमरावांनी मगरीसोबत दोन हात केले. मगरीमिठीतून सुटका करून घेतल्यानंतर जखमी अवस्थेतच त्यांनी स्वतःच्या मोटारसायकलने रुग्णालय गाठले. त्यांच्या या साहसाला अनेकांनी सलाम ठोकला.

गोंगवाडा येथील भीमराव मडकामी (वय ५५) धानरोवणीच्या कामासाठी शेतात गेले होते. दिवसभर शेतीचे काम आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते शेताजवळून वाहणाऱ्या इंद्रावती नदीत अंघोळ करण्याकरिता पाण्यात उतरले. दरम्यान, अंघोळ करत असताना अचानक पाठीमागून मगरीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी मगरीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्‍य झाले नाही. परंतु, त्यांनी हिंमत न हारता मगरीला आपल्या लाथ मारली. तरीही त्यांना मगरीच्या तावडीतून सुटता आले नाही. अखेर त्यांनी मगरीच्या गळ्याला हाताने आवळल्यानंतर मगरीच्या त्यांना सोडून दिले. मात्र, या झटापटीत भीमराव मडकामी यांचा डावा हात व छातीच्या डाव्या भागाला गंभीर इजा झाली.

प्रसंग मोठा भयंकर होता, मात्र जीव वाचला. विशेष म्हणजे यावेळी मदतीलाही जवळपास कुणी नव्हते. मोबाईल कव्हरेजही नव्हते. जवळपास उपचाराची सोय नाही. अशा स्थितीत त्यांनी स्वतःच्या मोटारसायकलने १७ किलोमीटर अंतरावरावरील भामरागड येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. तत्पूर्वी, त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ॲड. लालसू नोगोटी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ते भामरागडला उपस्थित नसल्याने त्यांनी भामरागड तालुक्‍यातील पत्रकारांशी संपर्क साधला व त्यांना मदत करण्यास सांगितले.

त्यानंतर पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन आपत्कालीन रुग्णवाहिका १०८ दुब्बागुडा येथे पाठविली. मात्र, तोपर्यंत ते मोटारसायकलने रुग्णालयात पोहोचले होते. लहानसहान घटनांमुळे माणूस अनेकदा कच खातो. इथे तर प्रत्यक्षात मगराशी दोन हात करून मृत्यूच्या दाढेतून भीमरावांनी स्वतःची सुटका करून घेतली.

हाताला, छातीला गंभीर जखमा
भीमराव मडकामी यांना मगरीशी झालेल्या झुंजीत हाताला व छातीला गंभीर जखमा झाल्या. रुग्णालयात पोहोचताच तेथे उपस्थित डॉक्‍टरांनी लगेच त्यांच्या हाताला व छातीला टाके लावून प्राथमिक उपचार केला. छातीला मगरीने चावा घेतल्याने शरीरात खोलवर जखम झाली. त्यामुळे सोनोग्राफी करणे आवश्‍यक असल्याने त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले. आपत्कालीन रुग्णवाहिका १०८ चे डॉ. किशोर पेंडारकर व वाहनचालक महेश ताटकलवार, सुजाता फ्रान्सिस, वंदना सिडाम, कोवे यांनी त्यांना मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com