esakal | आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो! अचानक कामावरून काढून टाकल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांचा टाहो
sakal

बोलून बातमी शोधा

hospuital workers are seeking to give their job back

जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या 29 कर्मचाऱ्यांना अचानकपणे एका दिवसात कामावरून काढून टाकल्याने आणि त्याऐवजी नवीन लोकांना कामावर घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.

आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो! अचानक कामावरून काढून टाकल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांचा टाहो

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी फोडला आहे.

जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या 29 कर्मचाऱ्यांना अचानकपणे एका दिवसात कामावरून काढून टाकल्याने आणि त्याऐवजी नवीन लोकांना कामावर घेतल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय, गडचिरोली येथे महाराष्ट्र शासनाने 29 कर्मचाऱ्यांची पदे आऊटसोर्सिंग करून पद भरण्याची मान्यता दिली होती. त्यानुसार वेगवेगळ्या कर्मचारी पुरवठा करण्याऱ्या एजंसीकडून निविदा मागविण्यात आल्या. 

सविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

शासन स्तरावर या निविदा प्रलंबित होत्या. परंतु शासनाने 2018 पासून रुग्णालयाची सुरुवात केली. या काळात या 29 पदांवर रुग्णालयाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी रोजंदारी 160 रुपये या दराने काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार हे कर्मचारी दवाखान्याच्या निर्मितीपासून सेवारत होते. शासनाच्या आऊटसोर्सिंग एजंसीची निवड झाल्यानंतर आपल्या 3 वर्षांपासून रुग्णालयामध्ये केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन आपल्यालाच संधी मिळेल असे लक्षात घेऊन त्यांनी सेवा दिली. 

जागतिक महामारी कोविड 19 च्या काळातसुद्धा जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णालयात सेवा दिली. अशा कठीण परिस्थितीमध्ये रुग्णालयात काम केलेल्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांना एक्‍युरेंस सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. ने या 29 पदांवर सामावून घ्यायला हवे होते .परंतु एक्‍युरेंस सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीने कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता, स्थानिक प्रशासनाशी चर्चा न करता अनुभव नसलेल्या इतर लोकांची निवड केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

अधिक वाचा - काम करताना लघुशंकेसाठी गेलेली महिला परतलीच नाही; आरडाओरड होताच बसला धक्का

विविध पक्ष पाठीशी....

आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मदत करावी म्हणून हे रोजंदारी कर्मचारी विविध राजकीय पक्षांकडेही धाव घेत असून या पक्षांद्वारेही त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न होत आहेत. या रोजंदार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने त्यांनाच कामावर कायम ठेवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे कर्मचारी आमदार डॉ. देवराव होळी यांना भेटायला गेले असताना त्यांनीही या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची भेट घेतली असता न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image