लाट कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नागपूर - गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचे असह्य चटके सहन करणाऱ्या नागपूरकरांना सोमवारी तापमान घसरल्यामुळे किंचित दिलासा मिळाला. पण, उन्हाच्या झळा व उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले. 

नागपूर - गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचे असह्य चटके सहन करणाऱ्या नागपूरकरांना सोमवारी तापमान घसरल्यामुळे किंचित दिलासा मिळाला. पण, उन्हाच्या झळा व उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले. 

विदर्भासह संपूर्ण देशभर सध्या उन्हाचा कहर सुरू आहे. सोमवारचा दिवसही अपवाद ठरला नाही. रविवारच्या तुलनेत आज अनेक शहरांमध्ये पारा एक ते दोन अंशांनी खाली आला. नागपूरचे कमाल तापमान 45 वरून 44 वर आले, तर रविवारी देशात दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर म्हणून नोंद झालेल्या ब्रह्मपुरीच्या पाऱ्यात 45.9 वरून 44.2 अंशांपर्यंत घसरण झाली. चंद्रपूरवासींसाठी मात्र सोमवारचा दिवस परीक्षा घेणारा ठरला. येथे विदर्भातील सर्वाधिक म्हणजेच 45.9 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. 

उन्हाच्या तडाख्यामुळे उपराजधानीतील दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसायला लागतात. जसजसा सूर्य डोक्‍यावर येतो, तसतशी उन्हाची दाहकता अधिक तीव्र होत जाते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या गरम झळा बसत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे. दुपारच्या सुमारास बहूतांश रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता विदर्भवासींची उन्हापासून सध्यातरी सुटका होणे शक्‍य नाही. 

श्रीगंगानगर देशात "हॉट'च 
राजस्थान-पाकिस्तान सीमारेषेवर असलेले श्रीगंगानगर शहर सोमवारीही देशात सर्वाधिक "हॉट' ठरले. येथे आज पारा आणखी चढून 46.8 अंशांवर स्थिरावला. कालही येथे 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

शहर तापमान 
नागपूर 44.0 
अकोला 44.8 
चंद्रपूर 45.9 
ब्रह्मपुरी 44.2 
वर्धा 44.5 
अमरावती 44.2 
यवतमाळ 43.0 
गोंदिया 43.5 
बुलडाणा 41.3 

Web Title: Hot wave constant