
सदर व्यक्तीचे प्लॉट परिसरात कौलारू घर आहे. बुधवारी संध्याकाळी कुटुंबातील महिला स्वयंपाक करीत असताना सिलिंडरमधून गॅसची अधिक प्रमाणात गळती झाली. यामुळे काही वेळाने भडका उडून घराला आग लागली.
लाखांदूर (जि. भंडारा) : स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्याची घटना बुधवारी रात्री येथील प्लॉट परिसरात घडली. आगग्रस्त राजू लोनबले यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - शहरातील शिवसेनेत दोन गट, बाळासाहेबांची जयंतीही करणार...
सदर व्यक्तीचे प्लॉट परिसरात कौलारू घर आहे. बुधवारी संध्याकाळी कुटुंबातील महिला स्वयंपाक करीत असताना सिलिंडरमधून गॅसची अधिक प्रमाणात गळती झाली. यामुळे काही वेळाने भडका उडून घराला आग लागली. यावेळी उपस्थितांनी घरातून पळ काढल्याने जीवित हानी झाली नाही. तथापि, या घटनेत घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य व घर जळाल्याने मोठ्या नुकसान झाले आहे.
या आगीत जुन्या घरातील लाकूडफाट्याने पेट घेतल्यामुळे आगीने उग्र स्वरूप धारण केले होते. परंतु, परिसरातील नागरिकांनी तातडीने आग विझविण्यास सुरूवात केल्यामुळे लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेची माहिती नागरिकांनी लाखांदूर पोलिसांना दिल्यावर पोलिस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलिस कर्मचारी राजेश शेंडे व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, निखिल गाडगे, श्री. चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
नक्की वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...
यावेळी परिसरातील घरांपर्यंत आग पसरू नये तसेच विजेचा धोका टाळण्यासाठी तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, संबंधित कुटुंबाचे लाखोचे नुकसान झाले आहे. सिलिंडरचा स्फोट होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अचानक आग लागल्याने या कुटुंबाला राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून तत्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ