जिवती येथे सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना तालुक्‍यातील कुंबेझरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी घरमालकाचे सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने सर्व्हेक्षणादरम्यान वर्तविला आहे.

जिवती(जि. चंद्रपूर) : गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना अनेकदा घडतात. कधी गॅस गळती, कधी नादुरुस्त शेगडी, कधी दुर्लक्ष, अशा अनेक गोष्टींमुळे अशा दुर्घटना घडतात आणि अनेकदा वित्तहानीसह जीवितहानीही होते. अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे घडली आणि एका कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना तालुक्‍यातील कुंबेझरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी घरमालकाचे सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने सर्व्हेक्षणादरम्यान वर्तविला आहे.
येथून सात किलोमीटर अंतरावर कुंबेझरी गाव आहे. या गावात नारायण चतरू पवार यांचे घर आहे. इथे नारायण पवार यांच्यासह अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरू पवार यांचे परिवार राहतात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी घरातील सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. त्यामुळे जीवितहानी टळली. स्फोटामुळे घराला आग लागल्यानंतर गावातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला माहिती दिली. राजुरा नगरपालिका आणि माणिकगड कंपनीचे अग्निशमन वाहन घटनास्थळावर येईपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. अग्निशमन वाहनांना पाठविण्याची व्यवस्था आमदार सुभाष धोटे यांनी केली.
या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात येईल या भीतीने गावातील नागरिकांनी आपापली महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गावाबाहेर सुरक्षितस्थळ गाठले. घर जळाल्याची माहिती मिळताच तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिस, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत घरातील सर्व साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहन, ऑटो, ऑटोचक्की, शेतीपयोगी साहित्य असे एकूण सुमारे 23 लाख 59 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यातून व्यक्त केला.

सविस्तर वाचा - का घेतला महिलांनी घरीच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय, वाचा
ऐन पावसाळ्यात निवासाचा प्रश्‍न
सिलेंडरच्या स्फोटात नारायण पवार, अंकुश नारायण पवार, विष्णू नारायण पवार, धरमसिंग नारायण पवार आणि सवई चतरु पवार यांचे संयुक्त घर जळून खाक झाले. ऐन पावसाळ्याच्या दिवसात डोक्‍यावरील छत नाहीसे झाल्याने या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House burnd in cylinder blast