हायटेंशन लाइनखालील घरे पाडली; पन्नासावर कुटुंबे रस्त्यावर

उच्चदाब वीज वाहिनीखालील घरे पाडल्यानंतर मातीचा ढिगारा.
उच्चदाब वीज वाहिनीखालील घरे पाडल्यानंतर मातीचा ढिगारा.

नागपूर : हायटेंशन लाइनखालील वाळू, माती, विटा व टिनाचे शेड असलेली 60 ते 70 घरे आज महापालिकेने पाडली. सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याने पन्नासावर कुटुंबे रस्त्यावर आली असून थंडीत रात्र काढावी लागली. नागरिकांचे सामानही फेकण्यात आल्याचे आरोप येथील नागरिकांनी केला असून परिसरातील नगरसेवक विजय चुटेले यांनी जेवणाची व्यवस्था केल्याने एकवेळचे भागले, परंतु उद्या काय करायचे? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला. 

जाटतरोडी येथील इंदिरानगर गिरी कॉलनीत 30 ते 35 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहे. महापालिकेने उच्चदाब वीज वाहिनीमुळे ही घरे खाली करण्यासंदर्भात येथील रहिवाशांना नोटीस दिली होती. आज महापालिकेच्या धंतोली झोनच्या पथकाने सायंकाळी कारवाई केली. अत्यंत गरीब परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या येथील नागरिकांत एकच खळबळ माजली. विटा-मातीची घरे असून उच्चदाब वीज वाहिनीपासून फार लांब असल्याचे काही नागरिकांनी नमूद केले. कारवाई करण्यापूर्वी आमची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते, असे येथील एका नागरिकाने सांगितले. एवढेच नव्हे तर दोन दिवसांची मुदतही धंतोली सहायक आयुक्तांना मागितली. नगरसेवक विजय चुटेले यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासोबत फोनवर चर्चा करून एक दिवसाची मुदत मागितली. मात्र, धंतोली झोनच्या सहायक आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनाही कारवाई केल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप नगरसेवक चुटेले यांनी केला. महापालिकेच्या कारवाईमुळे येथील शालेय विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे. एकीकडे गरीबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे दिले जात आहे. दुसरीकडे गरिबांना बेघर केले जात असल्याचा संताप चुटेले यांनी व्यक्त केला. महापालिकेने या गरीब नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

याशिवाय अतिक्रमण विभागाने बगडगंज येथील उच्चदाब वाहिनीखालील सत्यनारायण चांडक, युसूफ पटेल, काजी रियाजुद्दीन, प्रितपालसिंग हंसपालसिंग, अन्वर हुसेन, विनोद फुलेवाले यांचे बांधकाम पाडले. सतरंजीपुरा झोनमध्ये साईनगर, प्रेमनगर येथील अरुण बिसेन, सुरेश जयस्वाल, प्रकाश जयस्वाल, मारोतराव काठे, हरिभाऊ लांजेवार, प्रमोद टेटे, प्रभाकर खोब्रागडे, रमेश आग्रे, राहूल केशरवानी, सीताबाई कारेमोरे यांच्या घराचेही बांधकाम तोडण्यात आले. हनुमाननगर झोनमध्ये म्हाळगीनगरातील अजय जयस्वाल, टाले, टिंगरे, मुदलीयार यांचे बांधकाम भूईसपाट करण्यात आले. कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com