जंगल युद्धात माहिर सी-६० पथकाची नक्षलवाद्यांमध्ये दहशत; जाणून घ्या या कमांडोंबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

c 60

गडचिरोलीतील जंगलात 'सी ६०' पोलिस पथक (C60 police force) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxal) मोठ चकमक उडाली. यात २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

जंगल युद्धात माहिर सी-६० पथकाची नक्षलवाद्यांमध्ये दहशत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : गडचिरोलीतील जंगलात 'सी ६०' पोलिस पथक (C60 police force) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxal) मोठ चकमक उडाली. यात २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात चार मोठ्या नक्षलवादी नेत्यांचाही समावेश असून मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे हा ठार झाला आहे. त्याच्याशिवाय जोगम्मा, रेड्डी हे दोन नेतेसुद्धा ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांविरोधातील ही मोठी कारवाई असून सी-६० पथकाचे मोठे यश आहे. पण, हे सी-६० पथक कोणी स्थापन केलं आणि हे स्थापण्यामागचा उद्देश काय होता? हे तुम्हाला माहिती आहे का? (how C60 police force is formed in gadchiroli)

काही वर्षांपूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे एकत्रच होते. त्याकाळात नक्षली चळवळ चांगलीच सक्रीय होती. नक्षल्यांना जंगलाची माहिती असल्याने ते पोलिसांना चकमा देत होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे कट उधळण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी सन १९९० मध्ये सी-६० पथकाची स्थापना केली होती. त्यावेळी पथकामध्ये ६० जण होते त्यामुळे पथकाला नाव सी ६० असं पडलं.

गडचिरोलीच्या जंगलात कुठूनतरी गोळ्या झाडून नक्षलवादी पसार व्हायचे आणि पोलिस त्या दिशेने अंदाज घेत गोळीबार करत राहायचे. तेवढ्याच वेळात ते दुसरीकडे कुठेतरी कारवाई करून मोकळे व्हायचे. त्यामुळे यावर उपाय म्हणून सी-६० पथक तयार करण्यात आले. यामध्ये ६० शस्त्रसज्ज आणि पूर्ण प्रशिक्षित जवानांचा समावेश करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे नंतर ६० चे १०० - १५० अशी वाढ करत आज या पथकात जवळपास १००० जवान आहेत. या पथकाने नंतर मोठमोठ्या चकमकी यशस्वी केल्या.

सी-६० चे पथक का स्थापन करण्यात आले? -

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली कारवाया वाढू लागल्या. त्यामुळे यावर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचेच दोन विभागात (उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग) विभाजन करण्यात आले. दक्षिण भागात नक्षली कारवायांमध्ये वाढ झाल्याने प्राणहिता उप मुख्यालय येथे मार्च १९९४ साली सी-६० च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-६० चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. हे पथक नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. सी-६० पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते. या सी-६०चे पोलिस निरीक्षक एस. व्ही. गुजर हे पहिले प्रभारी अधिकरी होते.

स्थानिकांचा समावेश

विशेष म्हणजे गडचिरोली पोलिसांत जे स्थानिक कर्मचारी होते त्यांना जंगलाची, जिल्ह्याची, गावांची आणि ग्रामस्थांबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे नक्षल्यांबाबतच्या खबरी मिळविणे कठीण नव्हते. त्यामुळे सी-६० पथक स्थापन करताना गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पथकाला नक्षल्यांची माहिती मिळू लागली. नक्षल्यांचे कट उद्ध्वस्त करण्यात यश मिळू लागले, असेही कदम यांनी सांगितले.

अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांनी सज्ज

काळानुरूप कारवायांचे स्वरुप बदलले. आता अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातो. तसेच नक्षल्यांच्या कटाची माहिती मिळाली की क्षणाचाही विलंब न करता कारवाई केली जाते. प्रशिक्षित सी-६० येथील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान, नक्षल चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाइकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणाबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात.

loading image
go to top