असे कसे झाले? महावितरणचे पेमेंट ई-वॉलेट रिकामेच ! 

चेतन देशमुख 
शुक्रवार, 31 जुलै 2020

ऑनलाइन बॅंकिंगच्या आधारेही वॉलेट रिचार्ज करता येईल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉगिनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये आहे.

यवतमाळ : वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, म्हणून महावितरणने ग्राहकांना पेमेंट वॉलेटची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा महावितरणचा प्रयत्न होता. मात्र, तांत्रिक व इतर काही अडचणींमुळे योजना पहिल्या टप्प्यातच अडकली. परिणामी गाजावाजा करून सुरू केलेले पेमेंट वॉलेट रिकामेच राहिले आहे. 

महावितरणचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची ही एक संधी होती. महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट आणले आहे. या वॉलेटद्वारे वीजग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. अन्‌ वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येणार आहे. शिवाय बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येणार होते. ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे यामुळे सुलभ होणार असून, प्रतिबिलामागे पाच रुपये मिळविण्याची संधीही वॉलेटधारकाला मिळणार होती. त्यामुळेच अनेकांनी वॉलेटसाठी अर्ज करून नोंदणी करून घेतली. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातच शंभराच्यावर अर्ज आले होते. त्यातील काहींना महावितरणने बिल स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर काही त्रुटी व अडचणी समोर आल्या. आर्थिक विषयांशी संबंध असल्याने सध्यास्थितीत पेमेंट वॉलेट बंदस्थितीत आहे. त्यामुळेच मोठा गाजावाजा करून तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेली योजना मधातच अडकली आहे. सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज व त्यानंतर एक हजारांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल. डेबिट व क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बॅंकिंगच्या आधारेही वॉलेट रिचार्ज करता येईल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉगिनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये आहे. 

हे वाचा— कुठे आत्महत्या तर कुठे मृत्यू ..नागपुरात हे चाललंय काय.. दोन दिवसात मृत्यू तांडव.. वाचा सविस्तर

रोजगाराची संधी हाती येऊन सुटली 

कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीजमीटर रीडिंग करणारी संस्था, महिला बचतगट महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. त्यांना महिनाअखेरीस कमिशन अर्जदाराच्या वॉलेटमध्ये जमा होणार होते. महावितरण पेमेंट वॉलेटमुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी मिळण्याची शक्‍यता वाढली होती. मात्र, सध्या वॉलेटचा वापर स्थगित असल्याने हाती आलेला रोजगार गेला आहे. 

लॉकडाउनमध्ये आले असते उपयोगात 
लॉकडाउनच्या काळात महावितरणने वीजबिल भरणा केंद्र बंद केले होते. याकाळात वॉलेट सुरू असते, तर ग्राहकांना घरूनच वीजबिल भरता आले असते. परिणामी वीजबिल केंद्रावर होत असलेली गर्दी कमी होण्यात मदत झाली असती. मात्र, यापूर्वीच अडचणींमुळे वॉलेटचा वापर नागरिकांनी बंद केला होता. 

आर्थिक प्रकरणांशी संबंधित असल्याने सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही तांत्रिक कारणांनीमुळे वॉलेटचे काम स्थगित आहे. 
- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, वीज महावितरण कंपनी. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How did it happen MSEDCL payment e-wallet empty!