अडत बंद तर आठ टक्के आकारणी कशी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अडत घेण्याची पद्धत बंद केली. मात्र, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती याला अपवाद ठरत आहे. येथे अजूनही शेतकऱ्यांकडून ८ टक्‍क्‍यांपर्यंत अडत वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सरकारने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अडत घेण्याची पद्धत बंद केली. मात्र, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती याला अपवाद ठरत आहे. येथे अजूनही शेतकऱ्यांकडून ८ टक्‍क्‍यांपर्यंत अडत वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे व पैशाची मिळण्याची हमी असल्याने येथेच बरेच शेतकरी शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांची आवक आणि शेतमाल विकून मोकळे होण्याची घाई याच संधीचा फायदा काही दलालांनी करून घेतला. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील मध्यस्त म्हणून शेतमालाची विक्री करून देऊन त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अडत घेते होते. मात्र, कालातंराने हा प्रकार अधिक वाढल्याने दलालांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होऊ लागली. या संबंधीच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळेच सरकारने तीन-चार महिन्यांपूर्वी बाजार समित्यांमधून अडत बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय यानंतरही अडत सुरू असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु, सर्वांत मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप अडत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील विलास शेंडे या शेतकऱ्यांनी कळमना बाजार समितीत मिरची विक्रीसाठी आणली होती.

जवळपास १ लाख ८० हजार रुपयांच्या मिरचीची त्यांनी व्यापाऱ्यांना विक्री केली. व्यापाऱ्यांनी मिरचीच्या विक्रीचे दोन वेगवेगळे देयके तयार करून अडत म्हणून १२ हजार रुपये वजा करून पैसे देण्याची तयारी दाखविली. मात्र, शेंडे यांनी तेवढी अडत देण्यास नकार देत निघून गेले. शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास मनाई केली असताना, ती देयकातून कशी वजा केली, असा सवाल उपस्थितीत करीत बाजार समिती प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, यानंतरही बाजार समिती प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप विलास शेंडे यांनी केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कुठलीच मदत न मिळाल्याने मी ग्राहक मंच आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जोपर्यंत मला माझ्या शेतमालाचे पूर्ण पैसे मिळत नाही, तोपर्यंत न्यायीक मार्गाने लढा देत राहीन.
- विलास शेंडे, शेतकरी

शेंडे यांची तक्रार बाजार समितीला प्राप्त झाल्यानंतर याची चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी 
संबंधित व्यापारी आणि शेंडे यांची सुनावणी बोलविली आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून दलाली घेणे पूर्णपणे बंद आहे. 
- प्रशांत नेरकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना.

Web Title: How to pay off the eight-rupee interruption?