कोरोनाची करणी, खरिपाची कशी होईल पेरणी?; अशी झाली शेतकऱ्याची अवस्था

farmers in buldana.jpg
farmers in buldana.jpg
Updated on

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण आता इतरही क्षेत्रावर आपली संकटरुपी छाया सोडत आहे. कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप पेरणीवरही कोरोनाचे सावट गडद झाले असल्याचे दिसत आहे. सद्या लॉकडाउन असल्यामुळे शेती संबंधीत अनेक कामात बाधा पोहोचत असल्यामुळे व मजुरांची टंचाई भासत असल्याने शेवटच्या टप्प्यातील शेतीची कामे खोळंबली जात आहे. 

पीक घरात पडून असताना त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आगामी बी-बियाण्याच्या चिंता शेतकऱ्यांना सद्या सतावत आहे. त्यामुळे कोरोनाच्या या करणीत शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम जाणवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. महिनाभरातील संचारबंदीमुळे शेतीची मशागतीची अनेक कामे अडकली आहेत. ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीस शेतकरी पसंती देत असल्याने डिझेल मिळण्याच्या झंझटीमुळे अनेक ट्रॅक्टरही जागेवर उभे आहेत. इतरही अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत आहे.

सद्या रब्बीच्या मका सोंगणी व फरदडच्या कापूस वेचणीचा हंगाम असताना यासाठी मजूर मिळत नसल्याने जवळच येऊन ठेवलेल्या खरिपाच्या पेरणीपर्यंत शेतीची कामे होतील की, ही चिंता शेतकऱ्यास सतावत आहे. सद्या लॉकडाउनमुळे खासगी व्यापारी शेतमाल घेण्यास मागेपुढे पाहत असल्याने शेतमालाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबूज, खरबूज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता. 

पण ऐन पीक पदरात पडतानाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी, खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे उत्पन्न घटले व इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले असून, खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बि-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागतही करण्यात उदासिनच असल्याचे चित्र दिसत आहे.

पिकांचे नुकसान, अन् कर्जमाफीही लांबली
कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे आपल्या उद्रेकाने नुकसान केले. पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखाचे पीक रुपयात तर रुपयांचे पीक रस्त्यावर फेकावे लागल्याचे चित्र असून, कर्जमाफी अजूनही हवेतच फिरत असताना कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही आता लांबली आहे.

शासनाच्या योजनांचे ‘मृगजळ’; मात्र कृषी दुकानदारांची भीती
शासनाचे बांधावर खत बि-बियाणे देणार अशी घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांचा पूर्वीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना या घोषणांवर विश्वास नसल्याचे दिसते. कारण शासनाच्या घोषणानंतरही बि-बियाणे, खत देताना कृषी दुकानदार संधीचा फायदा घेत चढ्या दराने शेतकऱ्यांना साहित्य विकत असल्याचा अनुभव आहे.

आत्ताच अफवांच्या बाजाराने खतात तेजी
कोरोनामुळे खतांच्या कंपन्या बंद आहेत. त्यामुळे खताचा तुडवडा जाणवणार असून, दर वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच खत खरेदी करावे अशा अफवा काही दुकानदार उठवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com