बारावीचा पहिला दिवस सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत गेला. यंदा कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असून  इतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. 

नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत गेला. यंदा कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असून  इतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. 

इंग्रजीचा पेपर म्हटल्यावर कॉपीचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण दरवर्षी दिसून येते. यंदा मात्र कॉपीच्या घटनांमध्ये बरीच घट झाली असून संपूर्ण विभागामध्ये केवळ तीन घटना घडल्या. यामध्ये भंडारा येथील एक आणि गडचिरोलीतील दोन घटनांचा समावेश आहे. नागपूर शहरात ७० तर ग्रामीणमध्ये ७५ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. या केंद्रांवर शहर आणि जिल्हा मिळून ७१ हजार २६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बुधवारी हिंदी भाषेचा पेपर होणार आहे. शिक्षण मंडळातर्फे यंदा भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथकेनेमली आहेत. त्यामुळे केंद्रावर घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. कॉपी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नये यासाठी यावर्षी विशेष काळजी घेण्यात आली असून ‘गैरमार्गाशी लढा’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.  

२ हजार ९८९ परीक्षार्थी
कामठी  : विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाची पायरी समजली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. उद्या बुधवार (ता. एक) रोजी हिंदीचा पेपर आहे. कामठी पंचायत समिती कस्टोडियनअंतर्गत परिसरात सात परीक्षा केंद्रे असून, या केंद्रावरून २ हजार ९८९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज येथील ७४०, नूतन सरस्वती गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयातील ५१३, एम.एम. रब्बानी ज्युनिअर कॉलेज ५७३,  तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेज गुमथळा येथील ४१०, तर कन्हान स्थित इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज २१०, धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय २७१, श्रीनारायणा विद्यालय येथील २६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेत मोठे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून परीक्षा  नियंत्रक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर व गटशिक्षणाधिकारी कश्‍यप सावरकर यांनी खबरदारी घेतली आहे. प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेचा पहिला दिवस असल्याने परीक्षा केंद्रासमोर विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही गर्दी होती. 

चेहऱ्यावर हसू आणि आसू!
टाकळघाट ः पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती दिसून येत होती. वर्षभरातील परिश्रम आज इंग्रजी पेपरच्या माध्यमातून कामी येणार होते. पेपर सुरू व्हायच्या काहीवेळा आधी  विद्यार्थ्यांचे चेहरे हसरे तर काहींचे पेपर कसा जाणार यामुळे भीतीपोटी नाराजीत दिसत होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजीच्या पेपरमुळे विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला होता. इंग्रजी पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची पातळी कठीण असल्याचे दुपारी दोन वाजता पेपर सोडवून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता काही प्रश्न आम्हाला समजले तर काही समजले नसल्याची नाराजीतून प्रतिक्रिया दिली. त्यामुळे हा सर्व प्रकार भाषेच्या बदलामुळे घडला असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
शहराच्या विविध भागात रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू आहे. काही भागात मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. शहरातील या विकासकार्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याची माहिती आहे. विकासकार्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक पोलिस विभागाने १० ते ११ या वेळेत शहरातील काही प्रमुख सिग्नलवर वाहतूक मोकळी करून द्यावी, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, वाहतूक पोलिस विभागाकडून कुठलीही सुविधा केली नाही. विद्यार्थ्यांच्या हितार्थ करण्यात आलेल्या या  मागणीकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.

Web Title: HSC exam first day