'पुलिस को टीप किसने दिया' यावरून दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड राडा.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

प्रमोद काकडे
Thursday, 6 August 2020

काही दिवसांपूर्वी संघटितरीत्या दारूतस्करी करण्यासाठी बैठका झाल्या. यात क्षेत्र आणि हद्द ठरवून देण्यात आली. अनेक नवे दारूविक्रेते यात सामील झाले. त्यामुळे आता जुने आणि नवे दारूविक्रेतेच असा संघर्ष उफाळून आला आहे.

चंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. बंदीतसुद्धा खुलेआम दारूविक्री केली जात आहे. दारू विक्रीसाठी 'मोहल्ला कमिट्या' स्थापन करण्यात आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आता ही भीती खरी ठरायला सुरुवात झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी संघटितरीत्या दारूतस्करी करण्यासाठी बैठका झाल्या. यात क्षेत्र आणि हद्द ठरवून देण्यात आली. अनेक नवे दारूविक्रेते यात सामील झाले. त्यामुळे आता जुने आणि नवे दारूविक्रेतेच असा संघर्ष उफाळून आला आहे. या दारूविक्रेत्यांना पोलिसांनी अक्षरशः अनधिकृत परवानेच दिले आहे. सध्या चंद्रपुरात शहरात मोठ्या प्रमाणात दारू येत आहे. 

हेही वाचा - अवघ्या दीड एकर शेतीत उत्पन्न घेऊन 'ते' झाले लखपती..पण कसे? वाचा प्रेरणादायी बातमी  

 

बंदीतही दारूची विक्री

तीन हजार दोनशे रुपये देशीची आणि नऊ हजार रुपये विदेशी दारूची पेटी विक्रेत्यांपर्यंत पोचविली जात आहे. शहरात अमुलकर, इलियास, पव्वा, ठाकूर नामक व्यक्ती मुख्य विक्रेते आहेत. पोलिसांपर्यंत त्यांचे पैसे पोचविण्याची जबाबदारी जमीर आणि मिलींद यांच्याकडे आहे. 

पोलिसांना माहिती दिली कोणी 

तीन दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू पकडली. याची 'टीप' दिली कोणी यावरून दारूविक्रेत्यांमध्ये वाद झाला. ज्यांना बाबुपेठ परिसरात दारू विकण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या व्यतिरिक्त काही जणांनी या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. बाबुपेठ परिसरात दारूविक्रेत्यांच्या टोळीमध्ये तुफान हाणामारी झाली. एकमेकांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. या मारहाणीची जाहीर वाच्यता होऊन नये, यासाठी आपसांत वाद मिटवला आणि प्रकरण शांत केले. मात्र, ठरवून दिलेल्या एकमेकांच्या हद्दीत दारूविक्रेते घुसखोरी करीत असल्याने येत्या काळात दारूविक्रेत्यांमध्ये 'गॅंगवार' भडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नक्की वाचा - सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर

पोलिसांनी दिला वाद मिटवण्याचा सल्ला 

प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी आपसांत बाहेरच प्रकरण मिटवून टाका. वाच्यता होईल आणि काही दिवस धंदा बंद ठेवावा लागेल, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्यात आपसांत समझोता झाला आणि प्रकरण शांत झाले. मात्र, येत्या काळात हा वाद आणखी उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge gang war in chandrapur between wine sellers