भंडारा जिल्ह्यात ते करताहेत राजरोस वृक्षांची कत्तल!

bhandara
bhandara
Updated on

मुरमाडी(जि. भंडारा): मानवाने स्वत:च्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. परिणामी निसर्गचक्र पार विस्कटून गेले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, वने वाढवा माहिमेचा कितीही उद्घोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता थांबत नाहीए.
वृक्ष हे पृथ्वी व पर्यावरणाचे चैतन्य आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले असून असमतोल वाढला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर शतकोटी वृक्षलागवडीसारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. वृक्षांचे संगोपन व संवर्धन यासाठी कोट्यवधींचा खर्च होतो. दुसरीकडे मात्र, शेतामधील हजारो झाडांवर ठेकेदारांच्या माध्यमातून कुऱ्हाड चालविली जात आहे. परिसरात तोडून ठेवलेल्या लाकडांमुळे मोकळ्या मैदानांना जणू लाकूड आगाराचे स्वरूप आले आहे.
शेतकऱ्यांच्या पूर्वजांनी, आंबा, चिंच, टेंभुर्णी, बोर, जांभूळ अशा फळझाडांसोबतच कडुलिंब, आंजन, कीन, बाभूळ, मोह अशा वृक्षांची लागवड शेतशिवारात केली आहे. अनेक वर्षे जुनी असणारी ही झाडे शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून कापण्याचा सपाटा सध्या लाकूड ठेकेदार करीत आहेत.
जळाऊ लाकूड वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते. लाकूड ठेकेदार शेतकऱ्यांना गाठून झाडांचा सौदा करतात. वनविभागाशी साठगाठ असल्याने परवाना मिळविण्यापासून कटाई व वाहतुकीचा खर्च ठेकेदार उचलतो. त्यामुळे थोड्या रक्कमेच्या लालसेपोटी बहुमुल्य असलेली वृक्षसंपदा नष्ट केली जात आहे. ही झाडे अनेक वर्षे जुनी आहेत. पूर्वजांनी मोठ्या हिकमतीने त्यांची जोपासना करून झाडे मोठी केली. शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीत ही झाडे असली तरी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु, विनासायास मिळालेला हा वारसा जपण्याबाबत शेतकरीसुद्धा गंभीर नाहीत.
जैवविविधतेला धोका
विविध प्रजातींचे हे डेरेदार वृक्ष लाकूड ठेकेदार काही वेळांत भुईसपाट करून टाकतात.
एक झाड मोठे करण्यासाठी 20 ते 25 वर्षांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे या झाडांवर वटवाघळे, लहानमोठ्या पशुपक्ष्यांचा निवारा असतो. पर्यावरणचक्रात मोलाची भूमिका बजावणारे हे घटक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अशाप्रकारे शेतशिवारात डेरेदार वृक्षांची कत्तल होत असल्याने जैवविविधतेलासुद्धा धोका उत्पन्न होत आहे.

व्यापाऱ्यांची चांदी
सध्या मुरमाडी परिसरात अशी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक लाकूड ठेकेदार व व्यापारी या व्यवसायात स्थिरावले आहेत. या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वृक्षसंपदेवर त्यांचा डोळा आहे. शेतातील झाडे तोडून मोकळ्या जागेत ठेवली जातात. ट्रकभर माल गोळा झाला की मुख्य बाजारपेठ असलेल्या नागपूरला त्यांची विक्री केली जाते. लाकूडतोडीचा परवाना देतानासुद्धा शासनाने विचार करण्याची गरज आहे. याप्रकारामुळे वृक्षलागवड व संवर्धनाला हरताळ फासला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com