esakal | अमरावतीत लसीकरणाच्या लांबच लांब रांगांनी वाढवला नागरिकांचा पारा; माहिती मिळत नसल्याने मनःस्ताप

बोलून बातमी शोधा

null

अमरावतीत लसीकरणाच्या लांबच लांब रांगांनी वाढवला नागरिकांचा पारा

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : एकीकडे जिल्ह्यातील (Amravati district) जवळपास 95 टक्के लसीकरण केंद्रे (Vaccination center) बंदच असले तरी शहरी भागात सुरू असलेल्या काही केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला असून नागरिकांना वस्तुस्थितीदर्शक माहितीच दिली जात नसल्याने नागरिकांचा पारा चांगलाच भडकला आहे. (huge queue of people in Amravati for vaccination)

हेही वाचा: 'महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका; नागपुरातील मराठा समाज संयोजकांचं परखड मत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन तसेच प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे लसींचा तुटवडाच निर्माण झाला आहे. मंगळवारपासून लसीकरण केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या, मात्र तरी सुद्धा पहाटे चारपासूनच अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये नोंदणी करण्यात आलेले युवक सुद्धा सहभागी झाले होते. टोकन दिल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी निर्धारित वेळेत येण्यास सांगण्याऐवजी नागरिकांना तेथेच ताटकळत उभे ठेवण्यात आले.

1 मे पासून 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यासाठी केवळ पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहे. शहर तसेच जिल्ह्यात सुरुवातीपासूनच लशींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लसींचा साठा लवकर संपत असल्याने पहाटेपासून रांगेत उभे असलेल्यांनाही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभाग सुद्धा नियमित व सुरळीत लसीकरण केव्हा सुरू होणार? या प्रतीक्षेत आहे. जिल्हा प्रशासनाकडून जानेवारीमध्येच चार कोटी लसींची मागणी करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात आता मे महिना उजाडला तरी तेवढा साठा अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही.

आयसोलेशन केंद्रांवर नागरिकांचा गोंधळ

मनपाच्या अंतर्गत दसरा मैदान परिसरातील आयसोलेशन दवाखान्यात सुद्धा लसीकरणाची व्यवस्था आहे, मात्र तेथे सुद्धा मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. नोंदणी करण्यात आलेले युवक तसेच नोंदणी न झालेले अनेक नागरिक एकाच रांगेत उभे होते. तसेच लसीकरणाबाबत कुठलीही माहिती दिली जात नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राजापेठ परिसरातील एका लसीकरण केंद्रांवर नोंदणीत दुजाभाव होत असल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात आली होती. पहाटेपासून रांगेत उभे राहणाऱ्यांना परत पाठविण्यात आले होते.

हेही वाचा: डागा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ; कामबंद केल्याचा फटका

दुसऱ्या डोजचा गोंधळात गोंधळ

ज्या नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना ठराविक कालावधीनंतर दुसरी मात्रा घेणे आवश्‍यक असते. मात्र सध्या दुसरी मात्रा मिळत नसल्याने व्यवस्थाच कोलमडली आहे. बहुतांश ठिकाणी कोव्हिशिल्डची मात्रा आहे, तर कोवॅक्‍सिनचा तुटवडा आहे. कोवॅक्‍सिन घेणाऱ्यांची दुसऱ्या डोजच्या अडचणी होत आहेत.

(huge queue of people in Amravati for vaccination)