जाड सिमेंट रस्ते, इमारतीवरील काचा नागरिकांच्या मुळावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे.

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची जाडी गरजेपेक्षा जास्त असून, ते रात्रीही थंड होत नसल्याने शहरवासी होरपळत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. इमारतीला काचा लावण्याची फॅशन "बुमरॅंग' होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. 

शहरात महापालिकेकडून दोन टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामेही प्रस्तावित आहे. शहर सिमेंटचे जंगल झाले आहे. यामुळे शहराचे कधीकाळी 42 अंश सेल्सिअसपर्यंत असलेले तापमान आता 46 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. शहरातील सिमेंट रस्त्यांची जाडी व रस्त्यातील लोखंड तापमान वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. दिवसभरातील उन्हाने ते तापत असून, रात्रीही थंड होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उन्हाने सिमेंट रस्ते तापतात. सिमेंट रस्ते तापमानाची प्रक्रिया सतत होत असून, जमिनीच्या तापमानासह वातावरणातील तापमान वाढत असल्याचे मत विमानतळ प्राधिकरणातून निवृत्त झालेले मुख्य अभियंता अमिताभ पावडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. 

जमीन थंड होत नसल्याने भूजल स्रोतही आटत आहे. परिणामी झाडांतून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, तेही नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी पाऊस कमी होऊन भविष्यात शहराचे वाळवंट होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

इमारत सुंदर व आकर्षक दिसावी या मोहात अनेक बहुमजली इमारतींना बाहेरून काचा लावल्या आहेत. शहरातील लाखो इमारतींना सहा ते आठ एमएम जाडीच्या काचा असून, सूर्यप्रकाश आतमध्ये शिरत आहे. त्यातून इमारतीमध्येही उष्णता निर्माण होत असून, ही प्रक्रियाही शहराचे तापमान वाढवित आहे. इमारतीतील उष्णतेमुळे एसीचा वापर वाढला असून, तेही तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ज्या देशांमध्ये तापमान कमी असते तेथे इमारतींना काचा लावणे क्रमप्राप्त आहे. परंतु, कुठलाही विचार न करता पाश्‍चिमात्य देशाचे अंधपणे अनुकरण करणे शहरातील नागरिकांच्या मुळावर येणारे असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

विमानतळाची धावपट्टीही सिमेंटची तयार केली जाते. तिची जाडी फार कमी असते. मात्र, सिमेंट रस्त्यांची जाडी मोठी असून, त्यातील लोखंड आदीमुळे तापत आहे. रात्री थंडही होत नसल्याने 24 बाय 7 नागरिकांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागत आहे. इमारतीच्या काचांनीही यात भर घातली. 
- अमिताभ पावडे,  निवृत्त मुख्य अभियंता, भारतीय विमानतळ प्राधिकरण. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge rise in temperature in nagpur