esakal | ३० गावांतील नागरिकांची जान हथेलीपर! मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
sakal

बोलून बातमी शोधा

३० गावांतील नागरिकांची जान हथेलीपर! मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

३० गावांतील नागरिकांची जान हथेलीपर! मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : वनविभागाअंतर्गत ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर या तालुक्यांचा समावेश होतो. चारही तालुके जंगलव्याप्त आहेत. जंगलात वाघ, बिबट यांच्यासह अन्य वन्यप्राण्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. काही वर्षांत जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्याने बेसुमार वृक्षतोड झाली. मोहफूल संकलनानिमित्त मजुरांचा वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रापर्यंत वावर वाढला. वाघांची संख्या शंभरावर पोहोचल्याने त्यांना जंगलाचे क्षेत्र अपुरे पडते. त्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आजवर शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले. जखमींची संख्याही मोठी आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो पाळीव प्राणी गतप्राण झाले. जंगल अपुरे पडत असल्याने वाघ, बिबटे गावाशेजारी भटकत असल्याने नागरिक प्रचंड दहशतीत असून त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. वनविभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची या दहशतीतून मुक्ती करावी. तसेच ब्रम्हपुरी वन विभागाला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणीही पूर्ण करावी. असे केल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल. (Human-wildlife-conflict-intensifies-in-Brahmapuri taluka)

ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत ब्रह्मपुरीसह चार तालुक्यांचा समावेश होतो. यातील ब्रह्मपुरी तालुक्यात दक्षिण वन परिक्षेत्र व उत्तर वन परिक्षेत्र अशी विभागणी केली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात उत्तरेकडे सायगाटा व तोरगाव जंगल, तर दक्षिणेकडे एकारा भूज जंगलाने परिक्षेत्र विभागले आहे. उत्तर वनपरिक्षेत्रात १०२ गावांचा तर दक्षिण वन परिक्षेत्रात १९ गावांचा समावेश होतो. यातील जंगली प्राण्यांच्या हल्ल्याच्या प्रभावाने तालुक्यातील जवळपास ३० गावे प्रभावित आहेत. जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. जंगलात लोकांचा प्रवेश वाढत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे. यामुळे वन्यप्राणी गावापर्यंत येतात. यातून मानव-वन्यजीव संर्घष उभा ठाकला आहे. ब्रह्मपुरी वन विभागातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या इतर वन विभागांच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये विशेषतः वाघांची संख्या मोठी आहे.

२०१८ च्या व्याघ्रगणनेनुसार देशात २,९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ आहेत. ब्रह्मपुरी वनविभागात वाघांची संख्या अंदाजे १०० पेक्षा अधिक असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वाघांची संख्या मोठी असल्याची बाब ब्रम्हपुरी वन विभागासाठी दिलासादायक आहे. मात्र, दिवसेंदिवस ब्रह्मपुरी वन विभागात होणारा मानव-वन्यजीव संघर्ष नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वेळोवेळी जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या घडणाऱ्या घटना काळजाचा थरकाप उडविणाऱ्या आहेत. शिकारीसाठी वाघांना नवेगाव, नागझिरा व करांडला अभयारण्यात वावर करताना ब्रम्हपुरी तालुक्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष होते. वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने हा परिसर योग्य असल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. दर अडीच वर्षानंतर मादी वाघ पिलांना जन्म देते. वाघांच्या प्रजननासाठी या भागातील झुडपी जंगल पोषक आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढतच आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

वनविभागाने तयार करावा आराखडा

ब्रह्मपुरी वन विभागात वाघांची संख्या शंभरावर पोहोचली. जंगली प्राण्यांकरिता वनक्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे आता वाघ, बिबटे गावात येऊ लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात २२ जणांना जीव गमवावा लागला. तर १२८ नागरिक जखमी झाले. जंगलात खाद्य उपलब्धता पुरेशी नसल्याने वन्यप्राण्यांचे पाळीव जनावरे व मानवांवर हल्ले वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वाघाच्या हल्ल्यात जवळपास एक हजार ७०० प्राणी पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले. तर ७० जखमी झाले. त्यामुळे वन विभागाने कृती आराखडा आखण्याची गरज आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गाव-शिवाराकडे कूच करतात. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढतोय.

वनविभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत तालुक्यातील ३० गावे जंगलालगत आहेत. येथील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. खरीप हंगामानंतर नागरिकांच्या हाताला कामच नसते. लगत जंगल असल्याने ग्रामस्थ जंगलात रानमेवा, मोहफुले, तेंदूपत्ता, आयुर्वेदिक औषोधोपयोगी वनस्पती, बांबू आदी वनसंपदा गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळे वाघ, बिबट्याचा वावर अधिक आहे. वनसंपदा गोळा करण्याच्या मोहामुळे स्थानिक ग्रामस्थ जंगलात जातात. वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात शिरण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत. जंगली श्वापदांपासून बचाव करण्याकरिता वनविभाग वारंवार सूचना करतो. मात्र, त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात आणि जीव गमावून बसतात.

वाघाच्या हल्ल्यात दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने टप्प्याटप्प्याने मदत दिली जाते. ही मदत एकाच टप्प्यात देऊन नियमांमध्ये शिथिलता आणावी. जंगलव्याप्त भागात असणाऱ्या गावांच्या सभोवताल जाळीचे कुंपण आणि सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावून गावांचे व पर्यायाने ग्रामस्थांचे संरक्षण करावे. स्थानिक युवकांची वन विभागांतर्गत जंगलाचे व प्राण्यांचे संरक्षण करण्याकरिता नेमणूक करावी. पालकमंत्री विजय वडेट्टीवार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने मानव-वन्यजीव संघर्षाच्या समस्येकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे.
- प्रा. अतुल देशकर, माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

गावालगतच्या जंगलाला जाळीचे व ग्रीन नेटचे कुंपण करावे. त्यामुळे वन्यप्राणी सहजासहजी गावात येणार नाही. तसेच जंगलव्याप्त गावातील स्थानिक युवकांना वनविभागाने रोजंदारी तत्त्वावर कामावर घ्यावे. यामुळे गावातील कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटेल. गावातील नागरिक उदरनिर्वाहाकरिता वनसंपदा गोळा करण्यासाठी जंगलात भटकणार नाही. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाचा तिढा सुटण्यास मदत होईल.
- प्रा. डॉ. राजेश कांबळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य, आवळगाव-मुडझा क्षेत्र

(Human-wildlife-conflict-intensifies-in-Brahmapuri taluka)

loading image