वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपुरात शेकडो महिला विधवा, शासन योजनांच्या लाभापासून वंचित

आनंद चलाख/नीलेश झाडे
Thursday, 15 October 2020

 दरवर्षी लाखोंच्या संख्येने ताडोबातील वाघ बघण्यासाठी पर्यटक येतात. चंद्रपूर जिल्ह्यासाठी  ही भूषणावह बाब आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वाघ संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

राजुरा (जि. चंद्रपूर): ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याची ओळख सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. जगभरातून व्याघ्रदर्शनासाठी पर्यटक चंद्रपुरात दाखल होतात. पण, दुसरीबाजू म्हणजे याच वाघांच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो स्त्रिया विधवा झाल्या आहेत. घरचा कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. शासनाकडून मदतीची रक्कम मिळाली. मात्र, त्यांना मानसिक आधाराची तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्याची गरज आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी जगाला भुरळ घातली आहे.  दरवर्षी लाखोंच्या संख्येने ताडोबातील वाघ बघण्यासाठी पर्यटक येतात. चंद्रपूर जिल्ह्यासाठी  ही भूषणावह बाब आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वाघ संघर्ष टोकाला पोहोचला आहे.  हा संघर्ष टाळण्यासाठी काही वाघांना गोळी झाडून ठार करण्याची दुदैवी वेळ वनविभागावर ओढवली होती. 

हेही वाचा - निराधारांना तीन महिन्यांपासून 'आधार'च नाही, निधी अडकल्यानं उपासमारीची वेळ

राजुरा तालुक्‍यात धूमाकूळ घालणाऱ्या 'आरटी वन' वाघाला ठार करण्याची मागणी आता जोर धरत आहे. आरटी वन वाघाने आतापर्यंत दहा शेतकरी, शेतमजूरांचा बळी घेतला. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर, वनमजूर आणि सरपणासाठी वनात जाणारे गरीब लोक बहुतांशी ठार होतात. वाघाच्या हल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो स्त्रिया विधवा झाल्या आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुष वाघाचा बळी ठरल्याने स्त्रियांवर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. 

हेही वाचा - उत्कंठा ताणली जात असताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आप २५ लाख की धनराशी जीत चुके है’

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून आठ ते दहा लाख रुपयांची मदत केली जाते. या रकमेतून कुटुंबाचे काही प्रश्न नक्कीच सुटतात. मात्र, कुटुंबाला मानसिक आधार देताना मुलांना घडविताना स्त्रियांना मोठे कष्ट उपसावे लागत आहेत. वाघाच्या हल्यामुळे विधवा झालेल्या स्त्रियांना शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक विधवांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाघ बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे शासनाच्या तिजोरीत भर पडत आहे. दुसरीकडे वाघाचा हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची वाताहत सुरू आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundreds of woman are widow due to tiger attack in chandrapur