गोंदियात विजेचा शॉक लावून वाघाची केली हत्या; वनविभागाने तिघांना केली अटक 

Hunters kill Tiger by giving electric shock in Gondia
Hunters kill Tiger by giving electric shock in Gondia

गोंदिया : तालुक्यातील लोधीटोला शेतशिवारात मृतावस्थेत वाघ आढळलला होता. या घटनेचा अखेर पर्दाफाश झाला असून, शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना वनविभागाने अटक केली आहे. आरोपींनी विद्युत शॉक लावून वाघाची शिकार केली. रोशनलाल खेमलाल बघेले, मुकेश रोशनलाल बघेले (दोघेही रा. लोधीटोला), बालचंद सोनू राणे (रा. चुटिया) अशी आरोपींची नावे आहेत. वाघाचे अवशेष गायब असून त्यांचा व इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला लागून पांगडी जंगल आहे. या जंगल शिवारात गोंदिया शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडीपार सहवनक्षेत्रातील लोधीटोला येथील अमरनाथ पटले यांच्या शेतात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत असल्याचे रविवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी याची माहिती पोलिस आणि वनविभागाला दिली.

उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, माजी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार आणि वनविभाग तसेच पोलिस विभागाचे पथक पोहोचले. त्यांना अमरनाथ पटले यांच्या शेतात वाघ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. मात्र, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्या वाघाचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. 

वाघाच्या शिकारीसंदर्भात शोध घेण्याकरिता वनविभागातील पिटर या श्वानाला घटनास्थळावर नेण्यात आले. त्या श्वानाने तिलकचंद शरणागत आणि योगराज नागपुरे यांच्या शेतातून मृत वाघाचे अवशेष शोधून काढले. मृत वाघाच्या मागचा पाय नखासहित, पुढील दोन्ही पायांची नखे, डोक्याचा भाग आणि शेपटी बेपत्ता आहे. त्यामुळे त्या वाघाचा शिकार करण्यात आली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला. त्या आधारे वनविभाग व पोलिसांनी तपास सुरू केला. वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतशिवारातील शेतकरी व इतर संशयित व्यक्तींना या प्रकरणाची चौकशीकरिता उपवनसंरक्षक कार्यालयात बोलाविण्यात आले. 

चौकशीदरम्यान रोशनलाल बघेले, मुकेश बघेले व बालचंद राणे यांनी करंट लावून वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. आरोपी मुकेश याने २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ज्या ठिकाणी वाघाची शिकार केली ते ठिकाण दाखविले. मुकेशने वाघाचे तुकडे करण्याकरिता वापरलेली कुऱ्हाड वनविभागाच्या ताब्यात दिली, तर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा मुकेश व रोशनलाल यांनी वाघाला मारले व तुकडे फेकले ते ठिकाण दाखविले. यावेळी वाघाला मारण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य वनविभागाने ताब्यात घेतले. 

उल्लेखनीय म्हणजे, आरोपी रोशनलाल बघेले, मुकेश बघेले व बालचंद राणे यांची कसून चौकशी असता त्यांनी यापूर्वी करंट लावून रानडुक्कर व चितळाची शिकार केल्याची कबुली दिली. रोशनलाल बघेले याला यापूर्वी चितळ शिकारप्रकरणी अटक करण्यात आली होती.

३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी

आरोपी मुकेश व रोशनलाल यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची वनकोठडी दिली होती. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी बालचंद राणे यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com