"अवनी'ची शिकार बेकायदा 

"अवनी'ची शिकार बेकायदा 

नागपूर - पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीची (टी-1) शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

अवनीच्या शिकारीनंतर राज्यभरातून वाद-प्रतिवाद सुरू झाले. यात राजकीय हस्तक्षेपाची शंकाही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, "एनटीसीए'ने संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेऊन आठ नोव्हेंबरला तीन सदस्यीय समिती नेमली. यात निवृत्त अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक ओ. पी. कालेर, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे उपसंचालक जोस लुईस आणि "एनटीसीए'च्या नागपूर विभागीय कार्यालयाचे एआयजी हेमंत कामडी यांचा या समितीत समावेश होता. या समितीने राज्य सरकारकडे सोपविलेल्या अहवालात वनकायदा, शस्त्रकायदा आदींचे उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. दोन नोव्हेंबरला असगर अली खान याने गोळी झाडून अवनीची शिकार केली. पण, मुळात असगर अलीची नियुक्ती या कामासाठी करण्यात आलीच नव्हती. शिवाय त्याने ज्या बंदुकीने गोळी झाडली त्या बंदुकीचा परवानाही शफाअत अली खानच्या नावावर होता. ज्या वेळी अवनीवर गोळी झाडण्यात आली त्या वेळी घटनेच्या ठिकाणी शफाअत अली खान उपस्थित नव्हता आणि असगरकडे ही बंदूक वापरण्यासंदर्भात ऍथॉरिटी लेटरही नव्हते, ही बाब चौकशीत आढळून आली आहे. त्यातही असगर अलीला चौकशीदरम्यान बंदुकीचे मॉडेलही आठवले नाही. मुखबीर शेखने अवनीला बेशुद्ध करण्यासाठी ज्या औषधाचा मारा केला, त्याची वैधता 32 तासांपूर्वीच संपलेली होती. मुख्य म्हणजे मुखबीरने बेशुद्ध करण्यासाठी मारा केल्यावर परिणामाची प्रतीक्षा करायला हवी होती. पण, अवघ्या तीनच सेकंदांत असगर अलीने अवनीवर गोळी झाडली. चौकशीमध्ये असगर अली खानने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडल्याचे म्हटले आहे. मात्र, अशी कुठलीही परिस्थिती उद्‌भवली नसल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. वाघीण हल्ला करेल, अशी शंका असती, तर गोळीचे निशाण तिच्या डोक्‍यावर दिसले असते. मात्र, तिच्यावर मागच्या भागाने गोळी झाडण्यात आली आहे. हे ऑपरेशन करताना बॅकअप टीम सोबत नव्हती. बेशुद्ध केल्यावर वाघिणीला नेण्यासाठी आवश्‍यक असलेली गाडी नऊ किलोमीटर लांब होती. घटनेच्या ठिकाणी पशुवैद्यकही उपलब्ध नव्हते, याबाबी ठळकपणे नमूद करण्यात आल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने तीन नोव्हेंबरला अवनीला बेशुद्ध करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे दोन नोव्हेंबरलाच असगर अलीने ही शिकार केली, असेही अहवालात म्हटले आहे. 

अहवालातील ठळक मुद्दे 
- घटनेच्या दिवशी वाघीण आक्रमक नव्हती 
- असगर अलीकडे बंदुकीचा परवानाच नाही 
- बेशुद्ध केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदांत झाडली गोळी 
- टीममधील कुठल्याही सदस्याकडे अनुभव नव्हता 
- शिकार करताना संयम बाळगला नाही 

शफाअत अली खानची नियुक्ती झाली त्या दिवसापासून प्रक्रियेत घोळ असल्याचे आम्ही म्हणतोय. "एनटीसीए'च्या चौकशी अहवालाने ते सिद्ध केले. 
- जेरिल बानाईत, वन्यजीव प्रेमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com