थंडा...थंडा...कुल...कुल शिवायच गेला यंदाचा उन्हाळा, तुमसरमधील आईस्क्रीम विक्रेते बेरोजगार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

शहरातील बाजारात आइस्क्रीम विक्रेत्यांवर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. भरउन्हाळ्यात आइस्क्रीम विक्रीला परवानगी मिळत नाही. कोरोना आजाराची थंडगार पदार्थांवर वक्रदृष्टी असल्याने त्याचा फटका हंगामी व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. अद्याप आइस्क्रीम विक्रीवर बंदी असल्याने या किरकोळ विक्रेत्यांचे आर्थिक गणित पार बिघडून गेले आहे.

तुमसर (जि. भंडारा) : उन्हाळा म्हटले की उसाचा रस, आईस्क्रीम, लस्सी यावर सगळ्यांच्या उड्या पडतात. यंदा मात्र कोरोनामुळे हे पदार्थ चाखायलाही मिळणे, कठीण झाले. आणि यंदाचा उन्हाळा थंड न करताच निघुन गेला. ग्राहकांना या पदार्थांचा थंडावा मिळाला नाही, इथपर्यंत ठिक आहे, पण हे थंड पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचा रोजगारच यंउाच्या उन्हाळ्यात थंड पडला आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न उभा राहिला.
शहरातील बाजारात आइस्क्रीम विक्रेत्यांवर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. भरउन्हाळ्यात आइस्क्रीम विक्रीला परवानगी मिळत नाही. कोरोना आजाराची थंडगार पदार्थांवर वक्रदृष्टी असल्याने त्याचा फटका हंगामी व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. अद्याप आइस्क्रीम विक्रीवर बंदी असल्याने या किरकोळ विक्रेत्यांचे आर्थिक गणित पार बिघडून गेले आहे.
तुमसर शहरात मुख्य बाजारातील गणपती मंदिराच्या समोर तसेच इंदिरानगरातील दुर्गा मंदिर समोर सहा ते सात व्यावसायिक दरवर्षी किरकोळ आइस्क्रीम विक्री करतात. जवळपास दहा ते पंधरा वर्षांपासून याच ठिकाणी हातगाडीवरून वर्षभर आइस्क्रीम विकले जाते. विक्रेत्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून या व्यवसायात तेजी येते. लग्नसमारंभ, इतर कार्यक्रमात मोठे ऑर्डर मिळतात. तापमान वाढल्यावर आइस्क्रीमच्या दुकानांत दररोज गर्दी वाढलेली दिसून येते. परंतु, यावर्षी देशात कोरोनाने शिरकाव केला. थंडगार पदार्थ व पेय पिल्याने आजाराची भीती वर्तविण्यात येत असल्याने शासनाकडून सर्व थंड पदार्थ विक्रीला परवानगीच नाकारली. लॉकडाउनच्या काळात आइस्क्रीम विक्रीला परवानगी नाकारल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक झळ बसली आहे.
शहरातील आइस्क्रीम विकणाऱ्यांनी सांगितले की, या तीन ते चार महिन्यांत होणाऱ्या व्यवसायावरच वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण करीत असतो. परंतु, लॉकडाउनच्या काळात यावर्षी व्यवसाय ठप्प झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात जवळपास एक ते दीड लाखांचा व्यवसाय होतो. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत चार ते पाच लाखांची उलाढाल होते. त्यावर वर्षभर कुटुंब सांभाळतो.

सविस्तर वाचा - उपराजधानीत हत्याकांडांची मालिका, कायदा व सुव्यवस्थेचा उपस्थित झाला प्रश्‍न

परंतु, सध्या हा व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. ज्यांनी व्यवसायाकरिता बॅंकेतून कर्ज घेतले. त्याची परतफेड करणे कठीण झाले आहे. व्याजाचा डोंगर सतत वाढतो आहे. अशा परिस्थितीत त्यांची आर्थिक समस्या वाढत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Icecream sellers have no business